
नवीन नांदेड़। नांदेड शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या विष्णुपूरी धरणा वरील कोटीतीर्थ पंप हाऊस मध्ये झालेल्या बिघाडीमुळे संपूर्ण शहरवासीयांना गेल्या दहा दिवसांपासून निर्जळीला सामोरे जावे लागत आहे. भीषण पाणीटंचाईला जनता वैतागली असून तांत्रिक बिघाड तात्काळ दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा,अशा सक्त सूचना नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी मनपा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, दुरुस्तीचे काम दहा दिवस लोटले तरी पूर्ण न झाल्या बद्दल आमदार हंबर्डे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
नांदेड शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या विष्णुपूरी धरणावरील कोटीतीर्थ पंप हाऊस येथे १ मेच्या मध्यरात्री विद्युत मोटारीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद झालेला आहे. त्यामुळे नांदेड शहरातील झोन क्रं.०१ तरोडा (बु.), तरोडा (खु.), सांगवी, झोन क्रं.०२-अशोकनगर भाग, ०३-शिवाजीनगर भाग, झोन क्रं.०४-वजीराबाद भाग तसेच झोन क्रं.०५ मधील देगलुर नाका भागातील पाणीपुरवठा गेल्या दहा दिवसापासून बंद आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
पाण्याअभावी नागरिक त्रस्त असून पंप हाऊस मधील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी महापालिकेच्या वतीने होत असलेल्या दिरंगाई बद्दलही जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी बुधवारी दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली तसेच उपस्थित मनपा अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करून जनतेला होत असलेला त्रास दूर करावा, अशा सूचना आमदार हंबर्डे यांनी यावेळी दिल्या. पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेली टँकरची व्यवस्थाही अत्यंत कुचकामी ठरत आहे शहरातील अनेक भागात अद्याप टँकर पोहोचले नसल्यामुळे भर उन्हात नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. शहराचे तापमान 44 अंशावर पोहोचलेले असताना जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागते याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.
ही बाब अत्यंत गांभीर्याने घेत आमदार मोहनराव हंबर्डे यांनी मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. सुरुवातीला दुरुस्ती अवघ्या चार दिवसात होईल व चार दिवसानंतर पाणीपुरवठा सुरू केला जाईल असे शहरवासीयांना सांगितले असताना दहा दिवसानंतरही पंप हाऊस मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त का झाली नाही ? जनतेने आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची?असा सवालही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केला.
दरम्यान पंप हाऊस दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे आश्वासन मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी आमदार मोहनराव हंबर्डे यांना दिले. यावेळी अभियंता सुमित पाटील,जकी उल्ला खान,कार्यकारी अभियंता गोकुळे यांच्यासह मनपा कर्मचारी उपस्थित होते.
