श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील मौजे उमरा येथील गट न. ८३ मध्ये ये-जा करण्याकरिता असलेला आसोली शिव रस्ता अतिक्रमणमुक्त करून किंवा इतर पर्यायी बैलगाडी रस्ता उपलब्ध करून द्यावा यासाठी उमरा येथील शेतकरी गेल्या वर्षीपासून पायपीट करीत असून महसूल सप्ताह राबविण्यात जिल्ह्यात एक नंबरवर असलेले तहसीलदार अभिजीत जगताप यांनी सदर प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी निवेदनाद्वारे उमरावासीय शेतकऱ्यांनी केली आहे
सदर शेतालगत मौजे आसोली ता. माहूर ची शिव असून त्या शिव रस्त्याने आम्ही आजपर्यंत आमच्या शेतात बैलगाडीने ये-जा करीत होतो. परंतु सदर शिव रस्त्यालगतच्या काही शेतकऱ्यांनी संपूर्ण शिव रस्ता अनधिकृत अतिक्रमण करून ताब्यात घेतला आहे. ज्यामुळे आमच्या उपरोक्त मालमत्तेत बैलगाडीने ये-जा करण्याचा आमचा रस्ता बंद झाल्याने आम्हाला आमच्या मालकी ताब्यातील क्षेत्राची वहीती करण्यास प्रचंड अडचण येत आहे याप्रकरणी उमरा येथील सरपंचांनी ही अनेक वेळा शेतकऱ्यांना पानंद रस्ता मोकळा करण्याविषयी विनंती केलेली आहे.
शेतात बैलगाडीने ये-जा करण्यासाठी इतर कोणताही रस्ता उपलब्ध नसल्याने रस्त्याअभावी आमच्या मालकी व ताब्यातील क्षेत्र पडीत ठेवण्याची पाळी आली आहे. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सदरील शेतातील उत्पन्नातून चालतो. जर रस्ता उपलब्ध झाला नाही तर आमच्या कुटुंबीयाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे असे निवेदनात नमूद करून शेतकऱ्यांनी आनंद रस्ता मोकळा करून देण्याची मागणी तहसीलदार अभिजीत जगताप यांच्याकडे केली आहे. तहसीलदार अभिजीत जगताप यांना दिलेल्या निवेदनावर दिगांबर बंडूजी धोत्रे सुदाम शंकर राठोड बाबाराव मेरसिंग राठोड शोभाबाई अशोकराव राऊत राम शंकर राठोड यांचे सह अनेक शेतकऱ्यांचे स्वाक्षऱ्या आहेत