
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. आता ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत मराठवाडा व विदर्भातील अनेक आमदारही भाजपत जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान त्यांचे कट्टर समर्थक हदगाव आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून सम्पर्क केली असता सध्या मी काँग्रेसमध्येच आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घेऊ अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी न्यूज फ्लॅश 360 शी बोलतांना दिली आहे.
आज माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस आमदारांचा एक मोठा गट भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे. यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली असून, काँग्रेसचे नेते अलर्टवर आले असून, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक जुने नेते काँगेस पक्ष एकसंध ठेवण्यासाठी सरसावले आहेत. पण काही नेत्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये देखील संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे न्यूज फ्लॅश 360 प्रतिनिधीने हादगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला असता ते म्हणाले की, सध्या तरी मी काँग्रेस पक्षामध्येच आहे. अशोकराव चव्हाण हे माझे आदर्श आहेत, मात्र सध्या तरी मी कोणताही निर्णय घेतला नाही. पुढील निर्णय हा सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हिमायतनगर तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे मी सकाळी सात वाजल्यापासून प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत असून, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली असल्याचेही ते म्हणाले.
