पूरग्रस्त कॉ.मारोती केंद्रे यांचा महापालिका आयुक्त यांच्या कक्षात २६ जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा
नांदेड। महापालिका क्षेत्रातील खऱ्या पूरग्रस्तांना डावलून बोगस पूरग्रस्तांना अनुदान वाटप करून करोडो रुपयांच्या घोटाळ्यासह इतर घोटाळे करणाऱ्या महापालिकेतील दोषी अधिकारी – कर्मचारी यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करावे आणि हडप केलेली रक्कम वसूल करावी म्हणून सीटू व जमसंच्या प्रमुख पुढाऱ्यांनी दि.१६ जानेवारी पासून महापालिका आयुक्त यांच्या कार्यालया समोर अमरण साखळी उपोषण सुरु केले आहे.
त्या उपोषणाची दखल घेण्यात येत नसल्याने किंबहुना चौकशीचे संकेत दिसत नसल्याने सीटू संलग्न मजदूर आणि होकर्स संघटनेचे पदाधिकारी असलेले कॉ.मारोती केंद्रे यांनी टोकाचा इशारा देत प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी मनपा आयुक्त डॉ.महेश डोईफोडे यांच्या कक्षात आत्मदहन करण्याचा लेखी इशारा दिला असून निवेदनाच्या प्रति राज्याचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक नांदेड यांना दिल्या आहेत.
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या (जमसं) वतीने महापालिकेत संगणमताने झालेल्या विविध घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पूरग्रस्तांच्या अनुदान वाटपातील घोटाळा,आपत्ती व्यवस्थापण निधी घोटाळा,पद भरती घोटाळा,यांत्रिकी घोटाळा,ड्रेनेज लाईन घोटाळा,सिमेंट काँकरेट घोटाळा,कचरा घोटाळा,दिवाबत्ती घोटाळा,गुंठेवारी व बांधकाम परवानगी घोटाळा,बनवट पावती घोटाळा,बील कलेक्टर पदोन्नती घोटाळा,गार्डन मधील बोगस पावती व वृक्षतोड घोटाळा,घरकुल घोटाळा, मनपाच्या मोक्याच्या जमिनी परस्पर इतरांच्या नावाने केलेला घोटाळा,उप अभियंत्यास थेट अतिरिक्त आयुक्त पद बहाल करण्यात आलेला घोटाळा,सीसीटीव्ही कॅमेरा घोटाळा,स्वच्छता कामगार घोटाळा,अग्निशमन व इतर वाहने दुरुस्ती घोटाळा,रिपेरिंग घोटाळा,बांधकाम साहित्य घोटाळा या घोटाळ्यासह विविध घोटाळे मनपामध्ये राजरोसपणे सुरु असून या सर्व घोटाळ्यांची सीआयडी व विभागीय चॊकशी होऊन दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी म्हणून वरिष्ठ स्तरावर तक्रारी करण्यात आल्या आहेत.
या मागण्या तातडीने सोडवाव्यात म्हणून मनपा समोर अमरण साखळी उपोषण सुरु आहे. यापूर्वी सीटू कामगार संघटनेने पूरग्रस्तांच्या निधी संदर्भात ३ ऑगस्ट पासून वेगवेगळी सोळा आंदोलने केली असून पाच महिन्यात ८५ दिवस उपोषण व धरणे आंदोलन केले आहे.सत्ताधाऱ्यांकडून आंदोलकांना धोका निर्माण झाल्याचेही निवेदनात नमूद आहे. भारताला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाले असताना उपोषण करण्याची वेळ येणे म्हणजे दुर्दैवच म्हणावे लागेल. उदासीन महापालिका मात्र या आत्मदहना बद्दल अनभिज्ञ् आहे. असे कॉ.मारोती केंद्रे यांनी कळविले आहे.