नांदेड| मकर संक्रांतीचे औचित्य साधून भाऊचा माणुसकीचा फ्रिज आणि लायंसचा डबा या उपक्रमात तिळाची पोळी दिल्यामुळे निराधारानी आनंद व्यक्त केला असून लायन्सच्या डब्यासाठी २०२४ या वर्षात १८६ दिवसाची नोंदणी अद्याप झाली नसल्यामुळे अन्नदात्यांनी रुपये पंधराशे भरून स्वतःच्या हस्ते रुग्णालयात डबे वाटप करावे, लवकरच लायन्सच्या डब्याचे कॅलेंडर काढण्यात येणार असून त्यामध्ये प्रत्येक तारखेच्या अन्नदात्यांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
विविध सणाच्या दिवशी डब्यामध्ये गोड पदार्थ देण्यात येतात.गेल्या १४ वर्षात भाऊचा डबा व लायन्सचा डबा या उपक्रमात लोकसहभागाद्वारे आठ लाखा पेक्षा जास्त रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून देण्यात आले आहेत. सोमेश कॉलनी नांदेड येथील रयत रुग्णालयात माफक दरात उपचार करण्यात येत असल्यामुळे अनेक गरीब रुग्ण येत असतात.लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने गेली पाच वर्ष या रुग्णालयात जेवणाचे डबे लोकसभागातून पुरविण्यात आले आहेत. वर्ष २०२४ मध्ये ज्यांना आपल्या परिवारातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त अथवा प्रियजनांच्या स्मृती प्रित्यर्थ अन्नदान करायचे असेल त्यांनी रू.दीड हजार भरून संबंधित तारीख आरक्षित करायची आहे.त्या राखीव दिवशी अन्नदात्यांच्या हस्ते रुग्णांच्या नातेवाईकांना डबे देण्यात येतात.
डब्यामध्ये पोळीभाजी, वरणभाताचा समावेश असतो. सणांच्या दिवशी लायन्सच्या डब्यामध्ये आवर्जून मिठाई ठेवण्यात येते.आदल्या दिवशी स्वयंसेवकाकडून मोबाईलद्वारे अन्नदात्यांना सूचना देण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता रयत रुग्णालयात डबे वाटप करण्यात येतात. आजारपणामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या रुग्णांना या डब्यामुळे थोडासा दिलासा मिळतो. एका दिवशी फक्त एकाच अन्नदात्यांचे डबे देण्यात येणार असल्यामुळे आपल्याला हवी असलेली तारीख देणगीची रक्कम जमा करून आरक्षित करण्यात यावी.वर्षभरातील संपूर्ण ३६५ दिवसाची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लायन्सच्या डब्याचे कॅलेंडर काढण्यात येणार असून त्यामध्ये प्रत्येक तारखेच्या अन्नदात्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
लायन्सचा डबा व भाऊचा माणुसकीचा फ्रिज हे उपक्रम यशस्वी घेण्याकरणासाठी विलास वाडेकर, अजयसिंह ठाकूर, अरुण काबरा, प्रभुदास वाडेकर, कामाजी सरोदे,संतोष देशमुख, विजय वाडेकर, सुरेश शर्मा, संतोष भारती, हे परिश्रम घेत आहेत.इच्छुकांनी राजेशसिंह ठाकूर ९४२२१ ८५५९० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन लायन्स क्लब नांदेड सेंट्रल चे अध्यक्ष ॲड. उमेश मेगदे, सचिव शिवाजी पाटील, कोषाध्यक्ष सुनील साबू व प्रोजेक्ट चेअरमन दिलीप ठाकूर यांनी केले आहे.