नांदेड। शहरातील महात्मा गांधी मिशन्स् अभियांत्रिकी महाविद्यालया समोरील मुख्य रस्ता खोदून खैबर खिंड तयार केली जात आहे. त्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तीव्र विरोध केला असून विकास कामाच्या नावावर मनमानी करीत नांदेड शहराचे विद्रुपिकरण करणे तात्काळ थांबवावे आणि पूर्वी प्रमाणेच एमजीएम पुढील रस्ता करावा अशी मागणी पुढे आली आहे.
मागील अनेक महिन्यापासून विमानतळ संरक्षकभिंती पासून एमजीएम कॉलेज समोरील रोडचे सिमेंट काँक्रेटी करणाचे काम कासवगतीने सुरु असून ते नमस्कार चौका पर्यंत पूर्ण होण्यास वर्ष लागत आहे. पूर्वीचा हैद्राबाद नागपूर असलेला महामार्ग विमानतळ विस्तारिकरनामुळे बंद करण्यात आला असून सांगवीला हिंगोली नाक्यापासून वेगळे केले आहे.
शकडो वर्षांपासून सुरक्षित असलेला रस्ता खोदून दिवसाढवल्या मुरूम व गौण खनीजाचे उत्खनन केले जात आहे.एकंदरीत विकास कामाच्या नावावर शहराचे विद्रुपिकरण करणे सुरु आहे. तो रस्ता पूर्वी प्रमाणेच करावा,खोदून खिंड तयार करू नये अशा मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या सहीने देण्यात आले आहे. उपरोक्त मागणीसह शहरातील सर्वात वर्दळीचा चौक म्हणून झपाट्याने विकसित झालेला नमस्कार चौक येथे सुलभ सौचालय आणि प्रवासी निवारा तातडीने उभे करावेत ही मागणी यापूर्वी आणि दि.८ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात पुनःच करण्यात आली आहे.
नांदेड – नागपूर महामार्गा वर असलेल्या या चौकात बस थांबा असल्यामुळे येथे हजारो प्रवासी नेहमीच पहावयास मिळतात. परंतु तेथे प्रवासी निवारा नसल्याने महिला व लहान लेकरांना उन्हाताणात थांबावे लागत आहे. तासंतास वाहणासाठी थांबावे लागत असल्याने तेथे सौचालय होणे आवश्यक आहे.सौचालय नसल्याने विशेषता महिलांची मोठ्याप्रमाणात कुचबांना होत आहे.
ह्या जनहितार्थ मागण्याची जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा हैद्राबाद – नागपूर महामार्गांवर असलेल्या नमस्कार चौक येथे माकपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड तालुका सचिव तथा सीटू कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे दिला आहे. या मागण्यासाठी परिसरातील लोक आंदोलनात सामील होणार आहेत असे माकपच्या वतीने स्पष्ट केले आहे.