नांदेड| भारतीय बौद्ध महासभा, नवबौद्धांचे आरक्षण, धम्मदीक्षेचे कार्यक्रम, सामाजिक, सांस्कृतिक, वृत्तपत्रीय तसेच राजकीय क्षेत्रात भैय्यासाहेब आंबेडकरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही धम्मप्रसाराचे काम केले आहे. सामाजिक अन्याय अत्याचार प्रसंगी समाजाच्या मदतीला धावून गेले. आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीत भैय्यासाहेब आंबेडकरांचे योगदान महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन येथील साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे यांनी केले. भैय्यासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ते बोलत होते.
यावेळी माजी सरपंच कैलास गोडबोले, पुरभाजी गोडबोले, माधवदादा गोडबोले, श्रीरंग गच्चे, सुरेश गोडबोले, समता सैनिक दलाचे आनंद गोडबोले, गुणवंत गच्चे, रवी गच्चे, किशन गच्चे, उत्तम गोडबोले, राजेश गच्चे, इलू गोडबोले, ढगे तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या ग्रामशाखा महिला पदाधिकारी, बौद्ध उपासक, उपासिका, बालक बालिका यांची उपस्थिती होती.
सूर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर ऊर्फ यशवंत आंबेडकर यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त जवळा देशमुख येथील विश्वशांती बुद्ध विहारात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्प, धूप आणि पुष्प पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना दिली. यानंतर सुरज गोडबोले संचलित त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
त्यानंतर प्रज्ञाधर ढवळे यांनी उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना संबोधित केले. बोलत असताना ते पुढे म्हणाले की, भैय्यासाहेब आंबेडकर हे चैत्यभूमीचे आणि शिल्पकार आहेत. त्यांनी भीमज्योत लाँग मार्चचे नेतृत्व केले होते. भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास अनुसरून अधिक लेखन आणि संशोधन व्हायला हवे अशी अपेक्षा ढवळे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद गोडबोले यांनी केले. सूत्रसंचालन व आभार किशन गच्चे यांनी मानले.