ब्राह्मणगाव येथून हिमायतनगर येथे विक्रीसाठी लोणची घेऊन येणारा टेम्पोचा खोल खड्ड्यात पडून भीषण अपघात

हिमायतनगर,अनिल मादसवार| उमरखेड ब्राह्मणगाव येथून लोणची घेऊन हिमायतनगर शहरात विक्रीसाठी निघालेल्या भरधाव टेम्पोचा घारापूर रोडवरील खोल खड्ड्यात पडून भीषण अपघात रविवारी सकाळी दहाच्या सुमारास झाला. या अपघातात छोट्या टेम्पोची भयानक अवस्था झाली असून, चारही टायर आकाशाकडे झाले होते. टेम्पोमध्ये भरलेल्या मालाचे नुकसान झाले. सुदैवाने वाहनातील दोन्ही प्रवासी किरकोळ जखमी होऊन यातून बालंबाल बचावले आहेत. सदरील टेम्पो रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबाला धडकून खड्ड्यात पडल्याचे दिसून आले आहे.
हे पाहून आसपासचे नागरिकही अचंबित झाले झाले. हा प्रकार लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी अपघात कसा झाला हे पाहण्यासाठी धाव घेतली. सुरुवातीला प्रवास करणाऱ्यांना हा अपघात कसा घडला हे समजले नाही. नंतर टेम्पो वाहन रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबाला धडकून खड्ड्यात पडल्याचे दिसून आले. हिमायतनगर घारापूर रोडवर महावितरण कंपनीच्या कंत्राटदाराकडून रस्ता रुंदीकरणानंतर नवीन खांब उभारण्यात येत असून, ठेकेदाराने बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता रस्त्याच्या कडेला केवळ चार ते पाच फूट अंतरावर मनमानी पद्धतीने खांब उभारत असल्याचे चित्र आहे. महावितरण अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदाराने सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ते पळसपूर, हिमायतनगर ते घारापूर व तालुक्यातील इतर ग्रामीण भागात इन्फ्रा मार्फत नव्याने बांधलेल्या रस्त्यालगत वीज वाहिन्यांचे खांब बसविण्याचे काम सुरू आहे. ठेकेदारा मार्फत नवीन खांब उभारण्याचे काम भोंगळ पद्धतीने सुरू असताना महावितरणच्या वरिष्ठ अभियंत्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सदरील काम ठेकेदाराकडून सिमेंटऐवजी दगडी भुकटी वापरून आणि महावितरण विभागातील काहींच्या संगनमताने सरकारच्या डोळ्यात धूळफेक करून जनतेच्या जीवाशी खेळत आहे. तसेच उभारलेल्या खांबांना मजबुती देण्यासाठी वॉटर क्युरींगही करण्यात आलेले नाही. अशा बिकट परिस्थितीमुळे जोरदार वाऱ्यामुळे खांब जमिनीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खांब उभारण्याचे काम अनियमित व अयोग्य पद्धतीने केल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात हिमायतनगर तालुक्यात बांधकाम विभागाची कोणतीही परवानगी न घेता मनमानी पद्धतीने काम करून शासन व जणतेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदाराचे नाव काळ्या यादीत टाकून कंत्राट रद्द करण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ सूर्यवंशी, वामनराव मिरशे, दशरथ हेंद्रे यांनी केली असून, त्यासोबतच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिल्यानंतर अंदाजपत्रकानुसार रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावर विजेच्या खांबाच्या लाईन उभारण्यात याव्यात, अशीही तक्रार त्यांनी केली आहे. त्यामुळेच हे काम रखडले असून, या खांबांवरून वीज वाहक तारा यापूर्वी ओढल्या असत्या तर आज घडलेल्या अपघात वाहनातील दोघांना आपला जीव गमवावा लागला असता, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
आजच्या अपघातात टेम्पो रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या खांबाला धडकून 10 फूट खोल खड्ड्यात पडला. या अपघातात सुदैवाने कौशिक शेख जाकीर आणि अरबाज शेख हे दोघे किरकोळ जखमी झाले असून ते बालंबाल बचावले आहेत. एकूणच आजच्या दुर्घटनेमुळे महावितरणचे अधिकारी व खांब टाकणाऱ्या इन्फ्रा कंपनीच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावर खांब उभे करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ सूर्यवंशी, वामनराव मिरशे, दशरथ हेंद्रे यांनी केली आहे.
बोगस कामाच्या पितळे उघड
हिमायतनगर शहरापासून घारापुर कडे रस्त्याच्या बाजूला होत असलेल्या विद्युत पोल लाईनचे काम बोगस व निकृष्ट पद्धतीने होत असल्याचे वृत्त न्यूज फ्लॅश 360 मधून प्रकाशित करत आठ दिवसापूर्वी उघड केले होत, त्यानंतर महावितरणच्या हिमायतनगर येथील अधिकाऱ्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरचे काम बंद केले आज याच ठिकाणी छोटा टेम्पो या पोलला धडकला आणि अपघात झाला त्यामुळे येथे लावण्यात आलेल्या पोल जमिनीतून पूर्णतः उकडूड पडला असून, पोल उभा करण्यासाठी केलेल्या खड्डा केवळ दोन-तीन फुटचा असल्याचे दिसून आले आहे तर कॉंक्रिटीकरणात वापरण्यात आलेले साहित्य निकट असल्यामुळे पोल काँक्रेट वेगवेगळ्या झाले आहे. त्यामुळे करण्यात आलेल्याबोगस कामाची चौकशी करून गुत्तेदाराच नाव काळ्या यादीत टाकून अंदाजपत्रक प्रमाणे काम व्हावं अशी मागणी विकास प्रेमी जनतेतून केली जाते आहे.
