नांदेड -देगलूर -बिदर रेल्वे मार्गासाठी राज्याचा 50 टक्के वाटाचे हमीपत्र केंद्राकडे द्या

नांदेड| जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणाऱ्या नांदेड- देगलूर – बिदर या रेल्वे मार्गास मंजुरी मिळाल्यानंतरही राज्य शासनाचा 50 टक्क्यांचा आर्थिक त्याचा वाटा उचलण्यात आला नाही. त्यामुळे राज्य सरकारचा 50 टक्के आर्थिक वाटा उचलण्याचे हमीपत्र तातडीने केंद्र सरकारला द्यावे अशी मागणी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक व प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया यांच्याकडे केली आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्या दोनच महिन्यात खा. चिखलीकर यांनी मागील चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या नांदेड- देगलूर – बिदर या रेल्वेमार्गाच्या मागणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजुरी मिळवून घेतली. यासाठी पिंक बुक मध्ये आर्थिक तरतुदीही करून घेतली. त्यानंतर रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या सुरुवातीसाठी राज्य सरकारकडून भरण्यात येणारा ५० टक्के आर्थिक वाटा भरण्यात आला नसल्यामुळे या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकले नाही.
दरम्यानच्या काळात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे हा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला नव्हता आता महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचे सरकार असल्याने या प्रकल्पासाठी ५० टक्के आर्थिक वाटा उचलला जाईल अशी अपेक्षा खा.चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी अर्थसंकल्पातही लागणारा 50 टक्के आर्थिक वाटा उचलण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेली होती. त्यामुळे राज्य शासनाचे हमीपत्र केंद्र शासनाच्या रेल्वे विभागाकडे अध्यापित पोहोचले नाही.
रेल्वेच्या दक्षिण मध्ये विभागाने 25 ऑक्टोबर रोजी या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर सुद्धा सादर केलेला आहे. हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस, मा.ना.अजितदादा पवार यांची भेट घेणार असल्याचे खा.चिखलीकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने हमीपत्र केंद्र शासनाच्या रेल्वे विभागाकडे पाठवून प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी देशाचे सर्वाधिक यशस्वी ठरलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी वेळ घेऊन सहकार्य करावे, अशी विनंतीही खा.चिखलीकर यांनी केले आहे. आपल्या मागणीचे पत्र राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक व प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया यांना त्यांनी दिले आहे.
