नांदेडमहाराष्ट्र

रसिकांना समृद्ध करणारी गायिका हरपली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई| किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. डॉ. प्रभा अत्रे यांनी शास्त्रीय गायनातून देशभरातील रसिक नुसता मंत्रमुग्ध केला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. ठराविक पठडीच्या बाहेर जाऊन गायनासाठी त्या ओळखल्या जात. नाविन्य हे त्यांच्या गायनशैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वरांना तप:श्चर्येचे बळ होते. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात की, केवळ गायन नाही तर आपले रसिक जाणकार असावेत, यासाठी त्यांनी लेखन देखील केले. त्यांच्या संगीत सेवेसाठी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरविले आहे.

गेल्याच महिन्यात २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात त्यांना अटल संस्कृती पुरस्कार प्रदान सोहळ्यातील त्यांची शेवटची भेट ठरेल, अशी कल्पनाही नव्हती. त्यांना भेटणं, त्यांचं गाणं ऐकणं ही कायम विलक्षण अनुभूती असायची. भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी दिलेले योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे. प्रभाताईंनी भारतीय शास्त्रीय संगीताची सेवा करताना नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले. भारतीय संगीत त्यांचे कायम ऋणी राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि चाहत्यांना लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीत, कला क्षेत्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनामुळे संगीत आणि कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. प्रभाताई यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन, भावगीत गायकीवरही अत्रे यांचे प्रभुत्व होते. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. अत्रे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभावान आणि श्रेष्ठ कलावंताला मुकला आहे, अशा भावना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

त्यांचे गायन कला क्षेत्राला प्रेरणा देणारे व रसिकांना मंत्रमुग्ध करणारे होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ‘किराणा ‘ घराण्याच्या गायिका असलेल्या प्रभाताई यांनी बालपणापासून संगीताची आराधना केली. विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन करणाऱ्या अत्रे यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पोहोचविणाऱ्या या प्रतिभावान कलावंतांस भावपूर्ण श्रद्धांजली. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे,असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत – उपमुख्यमंत्री अजित पवार
“ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाने ज्ञान, विज्ञान, विधी, कला, साहित्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारे प्रतिभावंत व्यक्तिमत्व हरपले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. डॉ. प्रभा अत्रे यांनी आठ दशकांहून अधिक काळ आपल्या अप्रतिम गायनाने भारतीय संगीतक्षेत्र समृद्ध केलं. कोट्यवधी रसिकांची मन जिंकली.

ठुमरी, दादरा, गझल, भजन, भावसंगीत, नाट्यसंगीत, उपशास्त्रीय संगीतासारख्या गायकीतून गानरसिकांच्या मनावर अधिराज्य केले. पुण्यात जन्मलेल्या डॉ. अत्रे महाराष्ट्र, देश, जागतिक संगीतक्षेत्रासाठी भूषण होत्या. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन ही देशाच्या संगीत, कलाक्षेत्राची फार मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. पवार यांनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!