मुंबई। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील (उमेद) स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या कृषी व बिगर कृषी उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळवून देण्यासाठी  शासन प्रयत्न करत आहे. ‘उमेद’च्या महिलांचा उत्पादित माल मोठ्या कंपन्या आणि खरेदीदार यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘बायर – सेलर मीट’ हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रतिपादन ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले.
देशभरातील प्रमुख 41 साखळी व्यवसाय कंपन्यांच्या प्रतिनिधींसह राज्यभरातून स्वयंसहाय्यता गटाच्या आणि शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये 28 करार या कार्यक्रमात करण्यात आले. नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांनी बेसिक्सच्या सहाय्याने राज्यस्तरीय ‘बायर – सेलर मीट’ चे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य परिचालन अधिकारी परमेश्वर राऊत, अवर सचिव धनवंत माळी, उपसंचालक शीतल कदम उपस्थित होते.
प्रधान सचिव श्री. डवले म्हणाले की, “ग्रामविकास विभाग ‘उमेद’ अभियानाच्या माध्यमातून  ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वायत्त होण्यासाठी विविध प्रकारे मदत करत आहे. महिलांची उत्पादने दर्जेदार आहेत, गुणवत्तापूर्ण आहेत. आता त्यांना शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. साखळी व्यावसायिक आणि मोठमोठ्या कंपन्यांनी पुढे येऊन या महिलांना सक्षम बनण्यासाठी हातभार लावावा.
अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयवंशी यांनी ‘उमेद’च्या उत्पादक महिलांना सातत्याने विक्रीसाठी वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर खरेदीदार कंपन्यांना उत्तम प्रतीचा आणि शुद्धता असलेला शेतमाल आणि इतर उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय ठेवण्यासाठी यंत्रणेला जिल्हा आणि राज्यस्तरावरून कार्यरत करण्यात आलेले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यभरातील 34 जिल्ह्यातून ‘उमेद’ अंतर्गत कार्य करत असलेल्या महिलांच्या प्रतिनिधी उत्पादन किंवा शेतमालाच्या नमुन्यांसह उपस्थित होत्या. त्यात सोयाबीन, मिरची, हळद, तूर, हरभरा, मका, बाजरी, नाचणी, ज्वारी  यासारखे दर्जेदार धान्य आणि कडधान्य तसेच मसाले, गूळ, मध, फळे, वनौषधी, तेलबिया इत्यादी उत्पादने नमुना स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले होते. खरेदीदार म्हणून 30 पेक्षा जास्त संस्था आणि कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सेंद्रिय आणि शुद्धता असलेले उत्पादने महिलांनी उपलब्ध करून दिल्यामुळे खरेदीदार संस्था आणि कंपन्यांच्या प्रतिनिधी यांनी करार करण्यासाठी उत्साह दाखवला. या कार्यक्रमात खरेदीदार यांनी दाखविलेल्या रुचीमुळे भविष्यात महिलांना शाश्वत बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे.
Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version