![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2024/02/images-1-24.jpeg)
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या काँग्रेस पक्षाची अवस्था आज अशी झाली आहे की, कोणत्याही निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. कधीकाळी काँग्रेसच्या वादळासमोर पालापाचोळा वाटणारा भारतीय जनता पक्ष (पूर्वीचा जनसंघसहित) गेली दहा वर्षे केंद्रात पूर्ण बहुमताने सत्तेवर आहे. अवघ्या पंधरा वीस वर्षापूर्वी भाजप असा सत्तेत येईल असे कोणाला स्वप्नातही वाटले नाही. दुर्देवाने वास्तव असे आहे की, काँग्रेसची आजची अवस्था भाजपने नाही तर काँग्रेसने स्वत:च करुन घेतली आहे.
देशाला स्वातंत्र् मिळवून देण्यात काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. काँग्रेसचे तेच कर्तृत्व पाहून नागरिकांनी पंडित नेहरुंना अत्यंत अभिमानाने पंतप्रधानपदावर बसविले. त्यावेळी काँग्रेस समोर तुल्यबळ असा कोणताही विरोधी पक्ष नव्हता. स्वातंत्र्याने भारलेली त्यावेळीची पिढी होती. त्यामुळे आपला देश प्रगत व्हावा या दृष्टीने सुरुवातीला काँग्रेसने देशाच्या विकासाला सुरुवात केली. ज्या देशात साधी सुई बनत नव्हती तो देश आता मंगळ, चंद्रावर घट्ट पाय रोवू शकतो. या प्रगतीचा पाया त्यावेळी नेहरूंनी म्हणजेच काँग्रेसनेच घातला. ही प्रगती निरंतर तशीच सुरु राहिली. त्यामुळे लोकांनीही वारंवार काँग्रेसच्याच झोळीत सत्तेचे माप टाकले. एकीकडे देशाची अशी प्रगती सुरु असताना काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर वाळवी लागायला सुरुवात झाली. सुरुवातीला काँग्रेसला गटबाजीचा रोग जडला. प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस संघटनेत एकजिनसीपणा राहिला नाही. अगदी छोट्यातल्या छोट्या जिल्ह्यातही काँग्रेसचे दोन गट हमखास असायचे. विशेष म्हणजे त्यावेळचे काँग्रेसचे नेते गटबाजीचे समर्थनही करायचे. दोन गट असले की, एकमेकावर त्याचे नियंत्रण असते.
काँग्रेस श्रेष्ठीही गटबाजीला संपविण्या ऐवजी त्याला प्रोत्साहन देत. दोन गट असले की, जिल्ह्या जिल्ह्यात काय घडामोडी सुरु आहेत याची बितंबातमी श्रेष्ठींना समजते असे त्याचे समर्थान केले जायचे. या गटबाजीची उदाहरणे अगदी नावासहित जिल्ह्या- जिल्ह्यातील देता येतील. परंतु निष्कारण लेखाची लांबी वाढविण्याचा धोका पत्करायचा नसल्याने ती देत नाही. या गटबाजीला कंटाळून नंतर काही लोक काँग्रेस पासून दूर झाले. प्रबळ विरोधी पक्ष नसल्याने आणि सदैव सत्ता मिळत असल्याने काँग्रेस श्रेष्ठींनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. सामान्य जनता आपल्या पाठिशी आहे आणि आपली भूमिका योग्य असल्यानेच आपणाला लोक सत्ता देतात या समजात काँग्रेस नेते मश्गुल राहिले. परंतु अंतर्गत गटबाजीमुळे पक्ष संघटना पोखरली जातेय, त्यात सुधारणा केली पाहिजेत असा विचार करण्याचे कष्ट कोणी घेतले नाहीत. या गटबाजीमुळेच अनेक जिल्हयात काँग्रेसला पराभव सहन करावा लागला. अनेक चांगल्या नेत्यांचे करियर या गटबाजीमुळेच संपुष्टात आले. याची दखल घेण्याची कोणालाही फुरसत नव्हती. या गटबाजीमुळेच संघटनात्मक पातळीवर काँग्रेसला तडे गेले. परंतु डागडुजी करण्या ऐवजी काँग्रेस नेत्यांनी तडे गेलेल्या इमारतीतूनच आपला कारभार सुरु ठेवला. स्वातंत्र्याने भारलेली पिढी संपल्यानंतर काँग्रेसची कार्यपद्धतीही बदलत गेली. त्यानंतर काँग्रेसमध्ये एक प्रकारे सुभेदारी पद्धत सुरु झाली. या पद्धतीमुळेच काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले.
काँग्रेस सर्वधर्म समभाव व सर्व जाती धर्माना सोबत घेऊन चालणारा पक्ष असला तरी या पक्षातील सुभैदारी पद्धतीने काँग्रेसला मोठे नुकसान सहन करावे लागले. प्रदीर्घ काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात एक सुभेदारी नेता तयार झाला. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर सोलापूर सुशिलकुमार शिंदे, लातूर विलासराव देशमुख, नांदेड अशोकराव चव्हाण, सांगली पतंगराव कदम, अहमदनगर अगोदर विखे पाटील आता बाळासाहेब थोरात असे प्रत्येक जिल्ह्यात एक एक नेते तयार झाले. प्रत्येक निवडणुकीनंतर अशाच नेत्यांची वर्णी मंत्रिमंडळात लागत गेली. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांचे महत्व संघटनेत वाढत गेले. आणि नंतरच्या काळात काँग्रेसच अशा नेत्यांवर अवलंबून राहू लागली. कोणतीही निवडणूक आली की, या नेत्यांच्या सहमतीनेच उमेदवारी दिली जायची. पक्ष संघटनेवर नियुक्ती करायची झाल्यास याच नेत्यांच्या सहमतीने केली जायची. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही उमेदवारी देताना याच जिल्ह्यातील नेत्यांच्या सहमतीने दिल्या जायच्या.त्यात एखादा अपवाद असायचा हा भाग वेगळा. त्याचा परिणाम असा झाला की, प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या नेत्यांचे समर्थक तेवढे संघटनात्मक पदावर व स्थानिक स्वराज्य संस्थात दिसू लागले.
काँग्रेस जिल्हाध्यक्ष नेत्याच्या मर्जीतला, जिल्हा परिषद अध्यक्ष नेत्याच्या मर्जीतला अशा व्यवहाराने पक्षात हुजरेगिरी सुरु झाली. जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, ज्यांनी कित्येक वर्षे पदरमोड करुन पक्षाचे काम अत्यंत निष्ठेने केले त्या कार्यकर्त्यांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याशिवाय काहीही आले नाही. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्याची मोठी फळी हताश झाली. दुसरा परिणाम असा झाला की, प्रस्थापित नेत्याच्या विरोधात जे इतर नेते संघटनेत आहेत त्यांच्या नशिबी काँग्रेसमध्ये विजनवास आला. त्यांना संघटनात्मक पातळीवर पदे मिळाली नाही वा सत्तेत कधी वाटा मिळाला नाही. असे नेते पक्षात राहून निष्प्रभ होऊन गेली अथवा त्यांनी इतर पक्षाची वाट धरली. त्यामुळे पक्षात नेत्यांची दुसरी फळी उभी राहिली नाही. दुर्देवाने पक्षाची पोखरण करण्याऱ्या या वाळवीकडे कोणीही जातीने लक्ष दिले नाही. या ऊलट या सुभेदारीला उत्तेजन देणारे काही नेते दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही वावरत होते. त्यातून मग सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा ट्रेंड सुरु झाला. या ट्रेंडमुळेच मग आर्थिक घोटाळे सुरु झाले आणि त्याचे पर्यवसान काँग्रेसची सत्ता जाऊन वाताहत होण्यास सुरुवात झाली.
सर्वात दुर्देवाची गोष्ट अशी आहे की, आजही भाजपाच्या बलाढ्य सत्तेला जर कोणी आव्हान देऊ शकत असेल तर ती ताकद फक्त काँग्रेस पक्षातच आहे. काँग्रेस विचाराची किमान पाच दहा कार्यकर्ते आजही प्रत्येक गावात आहेत. परंतु ते आव्हान द्यायचे असेल तर काँग्रेसला सर्वात प्रथम पक्ष संघटना मजबूत करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. निवडणुकीला सामोरे जाताना काँग्रेस विचाराच्या निष्ठावान तरुणाला उमेदवारी देऊन त्याला रिंगणात उतरावे लागेल. तो कोणत्या गटाचा अथवा तटाचा आहे याचा विचार बाजुला करुन आता नव्या तरुणांची एक सशक्त फळी काँग्रेसला उभी करावी लागेल. आजची काँग्रेसची अवस्था भाजपाला एकट्याने लढा देण्याची नाही. परंतु जे जे सोबत येतील त्यांना घेऊन ही लढाई लढावी लागेल. पक्षात यापूर्वी झालेल्या चुका आणि कार्यपद्धती बदलून काँग्रेसला काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. दुस्तुरखुद्द प्रत्येक मतदार संघात काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी जातीने लक्ष घालून निष्ठावान तरुण कार्यकर्त्याला संधी देण्याची गरज आहे. लोकशाही प्रबळ विरोधी पक्ष अत्यंत गरजेचा असतो. त्याशिवाय सत्तेवर कोणाचा अंकुश राहणार नाही. ती गरज काँग्रेस चांगल्या पद्धतीने भागवू शकेल. फक्त संघटनात्मक पातळीवर जातीने लक्ष देऊन विचाराची लढाई विचाराने लढण्याची गरज आहे. ते फक्त काँग्रेसच करु शकते. गरज आहे ती काँग्रेस श्रेष्ठींनी मनावर घेण्याची . हेही दिवस जातील या विचाराने काँग्रेसने आता निर्णय घेण्याची गरज आहे. अपेक्षित यश आज मिळणार नाही. परंतु त्या अपयशातूनही नवे अंकुर उदयाला येतील. देशाला त्याची गरज आहे.
….लेखक….विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेडm मो.नं. ७०२०३८५८११, दि. १५.२.२४
![](https://newsflash360.in/wp-content/uploads/2023/11/Hardweyar-Nagu.jpg)