नांदेड, अनिल मादसवार| नांदेड येथे आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे… नांदेड हुजूर साहिब रेल्वे स्थानकावर देखभाल दुरुस्ती दरम्यान अचानक आग लागल्याने फलाटावर उभी असलेली एक रेल्वे बोगी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही बाब रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. सुदैवाने ही बोगी पॅसेंजर ट्रेनला जोडलेली नव्हती. मात्र, यामुळे रेल्वे विभागाचे मोठे नुकसान झाले असून, ते पाहणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
नांदेडमधील हुजूर साहेब रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी एक ट्रेन उभी होती. आज मंगळवार 26 डिसेंबर रोजी सकाळी 9 च्या सुमारास यातील एका बोगीला अचानक आग लागली आणि काही वेळातच ही बोगी जळून खाक झाली. ही परिस्थिती लक्षात येताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धाव घेतली. मात्र या बोगीला आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत रेल्वे अधिकारी बोलण्यास तयार नव्हते, तर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने अनेकांची पळापळ झाली.