शाळा-अंगणवाड्यांमधून प्रतिष्ठित व्यक्ती व कर्मचाऱ्यांनी वाढदिवस साजरे करावे
नांदेड| मुलांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तसेच मुलांना पौष्टिक पदार्थ देण्यासाठी शाळा-अंगणवाड्यांमधून प्रतिष्ठित व्यक्ती व कर्मचाऱ्यांनी वाढदिवस साजरे करावेत, अशी संकल्पना नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी अनेक बैठकातून मांडली होती. त्यानुसार भोकर तालुक्यातील कोळगाव खुर्द येथील ग्रामसेविका कविता बसवंते यांनी काल कोळगाव येथील अंगणवाडीमध्ये वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांना सकस आहाराचे वाटप केले. या अभिनव उपक्रमात गट विकास अधिकारी माधव केंद्रे, बालविकास प्रकल्प अधिकारी पी. एस. चाटलावार, अंगणवाडी पर्यवेक्षिका जरांडे, सरपंच कचरूपाई अमृता वाघमारे, उपसरपंच सागरबाई दामोदर अडकिने आदींची उपस्थिती होती.
शाळा, अंगणवाड्यांमधून मुलांचे पोषण व आरोग्य स्थिती सुधारणे, मुलांचे योग्य मानसिक, शारीरिक व सामाजिक विकासाचा पाया सुधारणे आदी उपक्रम राबवले जातात. आयसीडीएस मार्फत अंगणवाडीमध्ये सकस आहार पुरवठा तसेच शालेय विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेतून मध्यांन भोजन दिल्या जाते. परंतु दररोजच्या आहारापेक्षा वेगळे पौष्टिक पदार्थ मुलांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील प्रतिष्ठ नागरिक, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक,कश अंगणवाडी कार्यकर्ती व इतर कर्मचाऱ्यांनी आपला वाढदिवस साजरा करताना शाळा अंगणवाड्यांमधून साजरा केला तर विद्यार्थ्यांना आनंदासह पोषक असे पदार्थ देता येऊ शकतात. हे विद्यार्थी आपल्या गावचेच असून त्यांच्या विकासासाठी गावकऱ्यांनी देखील पुढाकार घेणे आवश्यक आहे.
काल कोळगाव येथे ग्रामसेविका कविता बसवंते यांनी अंगणवाडीमध्ये वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांना मटकी, सफरचंद, अंडी, केळी इत्यादी पोस्टीक पदार्थांचे वाटप केले. या अभिनव उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले. ग्रामसेविका कविता बसवंते यांनी अनोख्या पद्धतीने गावामध्ये आपला वाढदिवस साजरा करून अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना पोष्टिक आहाराचे वाटप केले. अशा प्रकारचे कार्यक्रम गावस्तरावर व्हावेत अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. या उपक्रमाबद्दल कविता बसवंते यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाला यांनी सत्कार केला.
दरवर्षी वाढदिवस घरीच साजरा करते. परंतु जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेमधील हा उपक्रम मला भावला. त्यामुळे मी माझा वाढदिवस अंगणवाडीमध्ये साजरा करण्याचे ठरवले. या उपक्रमात माझे कुटुंबीय सहभागी झाले होते. मुलांसोबत वाढदिवस साजरा साजरा करतांना मला खूप आनंद झाला. – कविता बसवंते, ग्रामसेविका
आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात मा. पंतप्रधान महोदयांनी असे अभिनव उपक्रम राबवण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार हे उपक्रम जिल्ह्यात राबवत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले. या उपक्रमाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.