नांदेड| चक्रवर्ती सम्राट अशोकाने बुद्धधम्माची दीक्षा घेतल्यानंतर भारतभर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. देशभरात ८४ हजार स्तूप बांधले. आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत धम्मप्रचारास पाठवले. चक्रवर्ती राजा सम्राट अशोकाची सुकन्या संघमित्रा भिक्षुणीने बुद्धगयेच्या बोधीवृक्षाची शाखा ( फांदी ) अनुराधापूर , श्रीलंका येथे नेऊन लावली आणि बौद्ध धम्म प्रचार कार्याला प्रारंभ केला.
आज श्रीलंका बौद्ध राष्ट्र म्हणून ओळखल्या जाते. जगातील सर्वात जास्त बौद्ध भिक्खूंची संख्या श्रीलंकेत आहे. अशा धम्मराष्ट्राचा अभ्यास करण्यासाठी येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो आणि ६० बौद्ध उपासक उपासिका यांचा जत्था नांदेड रेल्वेस्थानकावरुन श्रीलंकेकडे आज रवाना होणार आहे.
ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा यांच्या वतीने दरवर्षी बौद्ध राष्ट्रांचा अभ्यास दौरा आयोजित केला जातो. आज दि. ९ पासून नांदेड ते हैदराबाद आणि हैदराबाद ते चेन्नई असा रेल्वेप्रवास होणार असून चेन्नई येथून कोलंबो येथे विमानाने प्रस्थान होणार आहे. हा अभ्यासदौरा १८ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून श्रीलंकेतील अनेक ऐतिहासिक बौद्ध स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत. तसेच १९ रोजी खुरगाव येथे धम्मसहलीवरुन परतलेल्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. आज ९ नोव्हेंबर रोजी हुजुर साहेब नांदेड रेल्वेस्थानकावरुन हजारोंच्या उपस्थितीत हा जत्था रेल्वेने रवाना होणार आहे.