
हिमायतनगर। तालुक्यात महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक विविध योजनेचा लाभ देण्यात आले असुन या योजनेतील कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत, तर काही कामे पुर्णत्वास आली आहेत.मंगळवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी सोनारी येथील सिंचन विहीर, फळबाग लागवड कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे.
हिमायतनगर पंचायत समिती अंतर्गत गावांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन विहीर, फळबाग लागवड, जनावरांचा गोठा, शेततळे हि कामे शेतकरी लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत.
मागेल त्याला काम हि संकल्पना राबवून प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत नरेगाची योजना पोहोचली असुन अनेक शेतकऱ्यांनी विहिरीचे खोदकाम पुर्ण केले असले तरी मस्टर पेमेंट संथ गतीने सुरू असुन, ही योजना गतीने पुढे नेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
तालुक्यातील सोनारी येथे मंगळवारी नांदेड जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी भेट दिली आणि नरेगा योजनेतील लाभार्थ्यांच्या शेतातील सिंचन विहीर, फळबाग लागवड, जनावरांचा गोठा, शेततळे याची जायमोक्यावर जाऊन पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड म्हणाले की तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजना सिंचन विहीरी घेऊन फळ लागवड करावी या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपली उन्नती साधली पाहिजे असे सांगून पं.स. हिमायतनगर येथील रोजगार हमी विभागाच्या टिम्मचे कौतुक केले. तांत्रिक अधिकारी आनंद भिसे यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून लाभ मिळवून दिला. खऱ्या अर्थानं ते कौतूकास पात्र ठरतात. असे गौरवोद्गार उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी काढले.
