नांदेड| विद्यापीठ पदवी अभ्यासक्रमात सर्व ज्ञानशाखांमध्ये मराठी भाषा व साहित्य याविषयीची अभ्यासपत्रिका समाविष्ट करावी आणि नव्या अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मराठी भाषा व कौशल्य अभ्यासाचे श्रेयांक पूर्ववत ठेवण्यात यावे, अशी आग्रही मागणी करणारे निवेदन मराठी भाषा मंत्री श्री. दीपक केसरकर यांच्याकडे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केली.
मुंबई येथील महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, उपसचिव हर्षवर्धन जाधव, भाषा संचालक विजया डोनीकर, माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, डॉ. पृथ्वीराज तौर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर, मुंबई विद्यापीठातील मराठीच्या प्राध्यापक डॉ. वंदना महाजन, लोककला अकादमीचे डॉ. गणेश चंदनशिवे यांनी उच्च शिक्षणातील मराठी भाषेची सद्यस्थिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिली. विधी, कृषि, वैद्यक, अभियांत्रिकी तसेच विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, आंतरविद्याशाखा व मानव्यविद्याशाखेत पदवी स्तरावर मराठी भाषा व कौशल्य विकास याविषयीची अभ्यासपत्रिका अनिवार्य करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी सुरेश वांदिले, अनंत देशपांडे, अनुपमा उजगरे, अनिल गोरे, जयश्री देसाई, शमसुद्दीन तांबोळी, राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक श्यामकांत देवरे उपस्थित होते.