हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे वाळकेवाडी/दुधड ग्रामपंचायत अंतर्गत नरेगा व पंधराव्या वित्त आयोगाच्या कामाच्या चौकशी करून दोषी असलेल्या तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व या कामाची चौकशी करणारे विस्तार अधिकारी व शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती कार्यालय यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्या नुसार निलंबनाची कारवाई करावी. तसेच १५ व वित्त आयोग टेबलावर बसलेल्या तालुका व्यवस्थापक, मनरेगा विभागाचे मस्टर वितरित करणारे कंत्राटी कर्मचारी यांची हकालपट्टी करून विविध विकास कामे केलेल्या कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करूनही साधी चौकशी झाली नाही. यामुळे आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सोनबा वानोळे यांनी हिमायतनगर येथील पंचायत समिती व तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिला असून, अश्याच प्रकारचा कारभार तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत होत असल्याचे सांगितले आहे. सदर कामाची चौकशी व्हावी अन्यथा आम्हाला देखील बेमुदत आमरण उपोषण करावे लागेल असा इशाराही इतर गावकऱ्यांनी दिला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे दुधड/ वाळकेवाडी हे गाव शंभर टक्के आदिवासी वस्ती असुन, या गावाला आदिवासी उपाय व इतर योजनेअंतर्गत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी ग्रामपंचायत स्तरावर प्राप्त होत असतो. विविध योजनेचा निधी विविध कामावर खर्च करण्यासाठी आणि आदिवासी बांधवाना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपलब्ध निधी सदर ठिकाणी खर्च करण्याचा नियम आहे. मात्र उपलब्ध निधीतील कामे हे शेणाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे न करता मनमानी पद्धतीने कागदोपत्राची नियम दाखवून शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे. असाच काहींस प्रकार नरेगा तथा रोहयो अंतर्गत वाळकेवाडी येथे घडला असून, एक सिमेंट रस्ता तर दोन पेवर ब्लॉकचे कामे करण्यात आली. मात्र ही कामे स्थानिक मजुरामार्फत न करता कागदोपत्री मजुरामार्फत झाल्याची नोंद घेऊन, प्रत्यक्षात कामे ही ठेकेदारी पद्धतीने केल्याचा आरोप गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनात केला आहे. या निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना देण्यात आले असून, कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने येथील पंचायत समिती कार्यालयासमोर तक्रारकर्त्यानी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाळकेवाडी या गावात मोठ्या प्रमाणावर शेतमजुर, कामगारांची संख्या आहे. ग्रामपंचायत कार्यालयाकडुन मुळ मजुरांना आज पर्यंत शासकीय कामापासून वंचित राहावे लागत असल्याचे,आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सोनबा केदोजी वानोळे रा.वाळकेवाडी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. मागील काळात पंधराव्या, सोळाव्या वित्त आयोगाची विविध कामे करण्यात आली असे दाखवण्यात आले आहे. त्या कामामध्ये अंदाज पत्रकातील मानका प्रमाणे कामे न करता अतिशय निकृष्ट दर्जाची कामे केल्याने, त्या कामाची खातेनिहाय चौकशी करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीची मागणी दि.२६ सप्टेंबर आणि ०३ नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन केली होती. मात्र या प्रकरणाची साधी चौकशी देखील झाली नसल्याने त्यांनी हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केलं आहे.
या कामाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांनी दुधड जिल्हा परिषद गटातील पि.जे.टारपे विस्तार अधिकारी पंचायत तसेच एस. एस.नालंदे शाखा अभियंता,बांधकाम विभाग पंचायत समिती कार्यालय यांना निवेदना नुसार मौजे दुधड/ वाळकेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन प्रत्येक कामाची त्यावर उपलब्ध असलेल्या सर्व अभिलेख्यांसहीत व प्रत्यक्ष कामाची स्थळ पाहणी करून तात्काळ वस्तुनिष्ठ अहवाल माझ्या दालनात समक्ष तातडीने सादर करण्याचे आदेश देऊनही, अद्याप विस्तार अधिकारी पंचायत आणि शाखा अभियंता,बांधकाम विभाग पंचायत समिती हिमायतनगर यांनी गटविकास अधिकारी यांच्या लेखी आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
हिमायतनगर पंचायत समिती कार्यालय पत्र जावक क्रमांक पंचायत समिती १८०७/२०२३ दि. ०६/१०/२०२३ च्या पत्रानुसार आदेश देऊनही अद्यापपर्यंत चौकशी केले नसल्याने अखेर नाईलाजाने पंचायत समिती कार्यालयासमोर सोनबा केदोजी वानोळे यांनी आजपासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. यामध्ये त्यांनी यामध्ये दोषी असलेल्या तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व या कामाची चौकशी करणारे विस्तार अधिकारी व शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती कार्यालय यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्या नुसार निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच १५ व वित्त आयोग टेबलावर बसलेल्या तालुका व्यवस्थापक, मनरेगा विभागाचे मस्टर वितरित करणारे कंत्राटी कर्मचारी यांची हकालपट्टी करून विविध विकास कामे केलेल्या कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असल्याचे उपोषणकर्त्याने दैनिक गावकरीशी बोलताना सांगितले आहे.
तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात १५ ते १६ व्या वित्त आयोगाच्या व नरेगा,रोहयो योजनेच्या कामात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याने सदरील चौकशी अधिकारी कोणतीही चौकशी नकरता दोषींला पाठीशी घालण्याचे काम सध्या हिमायतनगर पंचायत समितीमध्ये चालू असल्याचे दिसून येत आहे.याकडे कर्तव्यदक्ष श्रीमती मिनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी त्वरित लक्ष घालुन विविध गावांतील कामाच्या केलेल्या तक्रारीच्या व त्या कामाच्या चौकश्या तात्काळ करण्याची मागणी तक्रारदार कर्त्याकडून होत आहेत. अन्यथा आम्हाला देखील बेमुदत आमरण उपोषण करावे लागेल असा इशाराही इतर गावकऱ्यांनी दिला आहे.