
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। तालुक्यातील रुई (बु.) येथे मागील १०-१२ वर्षांपासून कुठलीही आणि कुणाचीही परवानगी नसताना अनाधिकृतपणे स्टोन क्रेशर सुरु होते. त्याचबरोबर बेकायदेशीर रित्या दगडाचे उत्खनन करुन त्यापासून गिट्टी तयार करण्याचे काम सुरु असल्याच्या प्रकाराची तक्रार प्राप्त होताच तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी प्रत्यक्ष जायमोक्यावर जावून स्टोन क्रेशर ताब्यात घेतले आहे. स्टोन क्रेशरवर कारवाई करण्याची तालुक्यातील पहीलीच घटना असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नायगाव तालुक्यातील रुई (बु.) येथील माधव पांडे यांनी गट क्र. २५१ मध्ये १०-१२ वर्षांपासून अनाधिकृत स्टोन क्रेशर सुरु असून. बेकायदेशीर दगडाचे उत्खनन करुन शासनाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान करण्यात आले आहे. त्याचबरोबर या अनाधिकृत स्टोन क्रेशरला त्या भागातील तलाठी व मंडळ अधिकारी पाठबळ देत असल्याची तक्रार अंकुशकुमार देगावकर यांनी तहसीलदार नायगाव यांचेकडे दिली होती. आणि या प्रकरणाची चौकशी करुन अनाधिकृत स्टोन क्रेशर जप्त करण्यात याले व दगड उत्खनन केलेल्या स्थळाची ईटीस मोजणी करण्याची मागणी केली होती.
या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच नायगावचे मंडळ अधिकारी इजपवार यांना चौकशी करण्याचे आदेश तर दिलेच पण स्वतः जायमोक्यावर जावून चौकशी केली. अनाधिकृत स्टोन क्रेशरचा अहवाल इजपवार यांनी सादर केला आहे. या अहवालात त्यांनी गंभीर मुद्दे मांडले असून सदरचे स्टोन केशर विना परवानगी सुरु असल्याचे नमूद केले आहे. चौकशी दरम्यान परिसरातील २५० मिटर क्षेत्रात गिट्टी, दगड व चुरी असून गट क्रमांक २६८ मधून दगडाचे उत्खनन करण्यात आले. यातून अंदाजे १३०० ब्रास दगडाचे उत्खनन करण्यात आले असून या खानपट्टयाची ईटीस मोजणी करण्यात यावी असा अभिप्राय नोंदवला आहे.
सदरच्या स्टोन क्रेशरला कोणतीच परवानगी नसताना स्टोन क्रेशर मालक माधव पांडे यांनी सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षी स्वामित्व धनाची रक्कमही भरली आहे. वास्तविक महसूल विभागाच्या दप्तरी या स्टोन क्रेशरची नोंदच नसताना स्वामित्व धनाची रक्कम भरुन घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. क्रेशरसह गिट्टी, चुरी व दगड ताब्यात घेण्यात आले आहे. मंडळ अधिकारी इजपवार यांच्या अहवालानुसार तहसीलदारांनी कारवाई केल्यास माधव पांडे यांनी शासनाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान केल्याचे उघड होणार आहे.
