मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी धरणे आंदोलन

नांदेड। मराठवाड्याच्या हक्काचे पाणी उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणात सोडावे, या मागणीसाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्यावतीने आज दि. 15 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
मराठवाड्यात खरिपाची पिके हातची गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. पश्चिम महाराष्ट्राने मराठवाड्याचे पाणी अडवले आहे. उच्च न्यायालयाचे व सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असून व गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळातर्फे दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश देऊनही राज्य सरकारने पश्चिम महाराष्ट्राच्या दबावाखाली पाणी सोडले नाही. त्वरित मराठवाड्याचे हक्काचे पाणी सोडण्याची मागणी माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी येथील धरणेप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी कॉ. प्रदीप नागापूरकर, मराठवाडा जनता विकास परिषदचे सहसचिव डॉ.अशोक सिद्धेवाड, प्रा.बालाजी कोम्पलवार, आर. के. दाभोळकर, श्याम निलंगेकर, सौ.सुषमा गहिरवार, डॉ. पुष्पा कोकीळ, गणेश पाटील, डॉ.लक्ष्मण शिंदे, संजय वाघमारे, बालाजीराव पवार, देशमुख, डॉ.किरण चिद्रावार, संभाजी शिंदे, राजकुमार पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा इत्यादी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली मराठवाड्याच्या हक्काचे पाणी त्वरित जायकवाडीत सोडावे.
यासाठी सर्व आमदारांनी विधानसभेत मराठवाड्याचा आवाज उठवावा व मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवून द्यावे. येत्या आठ दिवसात मराठवाड्याचे न्याय व हक्काचे पाणी जायकवाडीत न सोडल्यास मजवीपतर्फे मराठवाडाभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मजवीपतर्फे मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गंगाधर गायकवाड, तिरुपती घोगरे, सूर्यकांत वाणी, इंजि. रामचंद्र उन्हाळे, खान मॅडम, इत्यादीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
