
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा ‘जीवनसाधना’ गौरव पुरस्कार नांदेड येथील माजी प्राचार्य डॉ. भागवत श्रीरंगराव ढेंगळे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. २०२२-२३ या वर्षीच्या ‘जीवनसाधना’ गौरव पुरस्काराची विद्यापीठाच्या वतीने घोषणा करण्यात आली. सदर पुरस्कार डॉ. भागवत ढेंगळे यांना दि. १८ ऑक्टोबर रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या इतर विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, शहरी भागातून उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेचे दयानंद कॉलेज ऑफ लॉ यांची निवड करण्यात आलेली आहे. ग्रामीण विभागातील उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गंगाखेड येथील संत जनाबाई एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शहरी विभागातील उत्कृष्ट शिक्षक म्हणून दोन शिक्षकांची निवड करण्यात आली असून सदर पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे. त्यामध्ये विष्णुपुरी येथील श्री गुरुगोबिंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेतील डॉ. सुहास सुधाकरराव गाजरे व नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मिर्झा मुश्ताक वसीम बेग यांना हा पुरस्कार (विभागून) देण्यात येणार आहे. ग्रामीण विभागातील उत्कृष्ट शिक्षक म्हणून धर्माबाद येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयाचे प्रा. डॉ. शिवाजी बळवंतराव पटवारी यांना देण्यात येणार आहे.
विद्यापीठ परिसरातील संकुलामधून उत्कृष्ट शिक्षक म्हणून औषधनिर्माणशास्त्र संकुलाचे प्राध्यापक डॉ. सैलेश जयंतीलाल वाढेर यांची निवड झाली आहे. शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कारामध्ये वर्ग-३ मधून उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार विद्यापीठातील उद्यान विभागाचे उद्यान सहाय्यक पांडुरंग माधवराव सूर्यवंशी आणि लेखा विभागातील रोखपाल विकास शंकरराव जाधव यांना जाहीर करण्यात आला आहे.
सन- २०२२-२३ चे जीवनसाधना गौरव पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालये पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी पुरस्कार विद्यापीठाद्वारे आयोजित दि. १८ ऑक्टोबर रोजीच्या कार्यक्रमामध्ये वितरीत करण्यात येणार आहेत. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे यांनी कळविले आहे.
