नांदेड। डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील अनुसूचित जाती व नवबौद्धाच्या निवासी शाळेत नायगांवमध्ये स्वतःला भोजन ठेकेदार म्हणवून घेणाऱ्यांनी गुंडाकरवी चक्क येथिल चिमूकल्या विद्यार्थ्यांवर बंदूकीचा धाक दाखवून अर्वाच्च शिविगाळ करित थेट मारहाण केल्याच्या दिनांक ७ जानेवारीच्या धक्कादायक व गंभीर घटनेनंतर पूनश्च संबधित विभागाचा बेजबाबदारपणा उघडकीस आलेला असतांनाच स्थानिक आमदार,खासदार तसेच,राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनीही आपल्या नांदेड जिल्हा दौर्यात या ठिकाणी भेट टाळून पाठ फिरवल्याने येथिल विद्यार्थी असूरक्षित असल्याची संतप्त भावना व सूर पालकांतून व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून नायगांव (बा.) येथे तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा आहे त्यामूळे या भागातील १७७ विद्यार्थी येथे वास्तव्यास राहून शिक्षण घेत असले तरिही येथे विद्यार्थ्यांना देण्यात येणारा नाश्ता,फळे व भोजनाचा दर्जा मात्र अनेकदा तक्रारीनंतरही सुधारलेला नाही कंत्राटदार बदलले असले तरिही या विभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक लांगेबांधे यामूळे त्यात कायम सातत्य असल्याने पून्हा एकदा हा प्रकार वाढीस आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याबाबत आपल्या पालकांसह स्थानिक व वरिष्ठ प्रशासनाला अवगत करुन दिल्यानंतर स्थानिक प्रशासनाने संबंधितास अवगत करुन दिल्याने आपल्या कर्तव्यात सुधारणा करणे दूरच त्याउलट त्यांना व त्याचबरोबर,विद्यार्थी व पालकांनाही संपर्क साधून भोजन पुरविणाऱ्या कंत्राटदाराने दमदाटी करण्याचा प्रयत्न केला.
आणि दिनांक ७ जानेवारीला रात्रीच्या वेळी संबंधित कंत्राटदार म्हणवून घेणाऱ्या रवि भोकरे यांनी कांही तरुणांना सोबत आणून येथे गुंडागर्दी केली त्यात कांही विद्यार्थ्यांना नांवे घेऊन बोलावून चक्क या चिमुकल्या सर्वासमोर बंदूकीच्या धाकावर अर्वाच्च शिविगाळ व अनेकांना जबर मारहाण करित असल्याने त्यांचा आरडाओरड ऐकून याबाबत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकारांना माहिती मिळाल्यानंतर ते या ठिकाणी तात्काळ धावले व त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठांना घटनेची माहिती दिली त्याच दरम्यान येथिल विद्यार्थ्यांनी एकजूटीने हिंमत दाखवून सदरच्या ठेकेदारासह त्याच्या सोबतच्या गुंडांना थेट कोंडून ठेवले.घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेऊनच कारवाई करणे अपेक्षित होते परंतू,त्यांना सोडून दिल्याची बाब समजल्यावर अनेक पालकांनी येथे धाव घेऊन जाब विचारल्याने अखेर पोलीसांनी त्यांनाच पोलीस ठाण्यात घेऊन जात मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांवर येथिल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन जाबजवाब नोंदविले व पालकांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदविला.मात्र एवढ्या गंभीर घटनेनंतर या विभागाच्या एकाही स्थानिक वा वरिष्ठांकडून तातडीने दखल घेऊन त्यांनी आजपर्यंत या बाबत गुन्हा नोंदविला नसल्याची माहिती कांही पालकांनी आमच्या प्रतिनिधीला बोलतांना दिली.
सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दोन अधिकाऱ्यांकडून चौकशी करुन प्रकरणात दोषी असल्याचे सांगून रवी भोकरे यांच्याकडून अन्य कंत्राटदाराला भोजनाचे कंत्राट दिल्याचे सांगण्यात आले परंतू,निविदाप्राप्त मुख्य कंत्राटदार कंपनी स्वतः येथिल कंत्राट चालविण्यास असमर्थ असल्याचे अनेकदा स्पष्ट झाल्यानंतरही त्यांचेसह निवासी शाळेत वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीनेच मुख्यालय सोडणे व येथेच वास्तव्याला असणे बंधनकारक असतांनाही या गंभीर घटनेवेळी प्रारंभी अनुपस्थित असलेल्या व घटनेनंतर उशीराने घटनास्थळी आलेल्या तसेच,येथिल सिसीटीव्ही बंद असल्याचे सांगून दोषींना पाठबळ देणारे आणि विद्यार्थी-पालक-निवासी व प्रशासन यांच्यातील दुवा असलेल्या स्थानिकच्या अधिक्षकांवर त्याचबरोबर, येथिल भोजन पुरविणाऱ्या मुख्य कंत्राटदारावरही अकार्यक्षम, कर्तव्यात कसूरीचा ठपका ठेवून कायदेशीर दूरच परंतू,अद्याप प्रशासकीय स्तरावरही ठोस कारवाई करणे टाळण्यात आल्याचे दिसून आलेले आहे. त्यामूळेच येथे आर्थिक गैरव्यवहार,अनियमितता नाही तर,सारे काही कागदोपत्री योग्यच असल्याचा निर्वाळा देत प्रसंगी अशा वा संभाव्य घटनांनाही संगनमतातूनच या विभागाचे स्थानिक प्रशासन, सहाय्यक आयुक्त असो वा वरिष्ठांकडून बेजबाबदारपणाने काम करित असल्याचा प्रत्यय या घटनाक्रमावरुन येतो आहे.
महत्वाचे म्हणजे या गंभीर घटनेनंतर नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, विधानपरिषदेचे सदस्य आ.राम पाटील रातोळीकर तसेच, नायगांव विधानसभा मतदारसंघातून महायुतीत रिपाई(आ) गटाला सुटलेल्या परंतू,भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजयश्री प्राप्त आ.राजेश पवार यांच्यासह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग स्वतःकडेच असलेले राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे तसेच,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनीही आपल्या नुकत्याच झालेल्या नांदेड दौर्यात या निवासी शाळेला भेट देऊन त्यांनी या गंभीर घटनेची नोंद घेत विद्यार्थ्यांशी हितगुज करणे, सोबतच,दोषींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत तसेच, येथिल रिक्त पदांचा भरणा करण्यासह विद्यार्थ्यांना त्यांचे मूलभूत अधिकार,न्याय व हक्क मिळवून देत त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रशासनाला आदेश देणे अपेक्षित होते परंतू, सत्ताधाऱ्यांकडून या घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेण्याऐवजी चक्क भेट टाळून पाठ फिरविल्याने याठिकाणी आपला पाल्य असूरक्षित असल्याची संतप्त भावनात्मक सूर पालकांतून आळविला जात आहे.
चिमूकल्यांच्या भवितव्याशी खेळ !
विशेष बाब म्हणजे तब्बल १७७ विद्यार्थी असलेल्या या निवासी शाळेत १९ मान्यपदांपैकी १२ पदे कार्यरत असून तिन्ही भाषा व गणित विषय शिक्षकांची पदे रिक्त तर, येथिल तिन अन्य ठिकाणी प्रतिनियुक्तीवर व एकजण येथे प्रतिनियुक्तीवर आहे.रिक्त विषय शिक्षकांच्या जागी तासिका तत्वावर पदे भरून ज्ञानार्जन करण्यांत येत असल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगण्यात आले असून रिक्त पदे,नाश्ता व भोजन आदी बाबींकडे दुर्लक्ष यामूळे येथिल विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी प्रशासनाकडून जणू खेळच सुरु असल्याचे त्याचबरोबर,आणि देशाचे भावी आधारस्तंभ असलेल्या या पिढीच्या उज्वल भविष्याकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या आर्थिक हितासाठीच सामाजिक न्याय विभागाचे संबंधित अधिकारी कुंभकर्णी झोपेच्या सोंगाधिन गेल्याचे यावरुन स्पष्ट जाणवते.