नांदेड/हदगाव, शे.चांदपाशा| हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाची मागणी केद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपण मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हि भूमिका असून, सदैव मी समाजाच्या पाठिशी आहे असे सांगितले. एव्हडेच नाहीतर त्यांनी आपल्या लेटरहेडवर राजीनामा आंदोलकांकडे दिला आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असताना विद्यमान सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास वेळ लावत आहे. त्यामुळे मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरु केले असून, उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. अनेक गावांमध्ये आजी माजी नेते, मंत्री, आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिथे जिथे नेते जातील तिथे मराठा आंदोलक त्यांना विरोध करत आहेत.
अश्यातच मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी शिंदे गटाचे खा. हेमंतभाऊ पाटील यांनी आपल्या खासदारकी पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा समाजातील आरक्षणाच्या मागणी केद्र सरकारच्या दरबारात मांडावी यासाठी काही आंदोलकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांनी खासदारकीचा राजीनामा द्या अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला तत्काळ प्रतिसाद देत खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्ष यांच्या नावे स्वतःच्या लेटर हेडवर राजीनामा लिहून आंदोलकांना दिला.
हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांचा ताफा आज हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अडविला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आणि जरांगे यांच्या तब्येतीला काही झाले नाही पाहिजे असे आंदोलकांनी हेमंत पाटील यांना सांगितले. त्यावर दोन दिवसांनी मी स्वतः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसणार आहे असे हेमंत पाटील यांनी सांगितले. यावेळी पुढे बोलताना हेमंत पाटील म्हणाले की, आपण आजपर्यंत समाज व शेतकऱ्यांचे प्रश्न शासन स्तरावर मांडले आहेत. मराठा आरक्षण चळवळीमध्ये देखील आपण कार्यकर्ता म्हणून सहभाग घेतला आहे. खासदार या नात्याने लोकसभेतही आपण मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली भूमिका आहे. गावातील तरुणांनी गावामध्ये तसेच जिल्ह्यातील तरुणांनी जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करावे. लोकसभेमध्ये 23 खासदारांच्या उपस्थितीमध्ये आपण आरक्षणाचा मुद्दा मांडला होता. राज्यात समाजाची स्थिती अतिशय खराब आहे. गड किल्ल्यावर राहणारा समाज आज मोल मजुरी करीत आहे. त्यामुळे समाजाला आरक्षणाची गरज आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तसेच राज्यभरात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न लक्षात घेऊन आपण पदाचा राजीनामा देत असून लवकरच लोकसभा अध्यक्षांकडे राजीनाम्याचे पत्र पोचवले जाणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.