मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या साईनाथ टर्के यांच्या परिवाराला दहा लाखाचा धनादेश सुपूर्द
नांदेड। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास शासन दिरंगाई करीत असल्या कारणाने अतिशय उद्विगन भावनेतून स्व.साईनाथ टर्के यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
सदरील प्रस्ताव शासन दरबारी दाखल करून मुख्यमंत्री विशेष सहायत्ता निधी अंतर्गत रुपये दहा लाखाची अर्थिक मदत शासनाच्या माध्यमातून देण्यात आली. मागील महिन्यात जिल्हाधिकारी,पोलीस महानिरीक्षक,परीक्षेत्र नांदेड आणि पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाची बैठक पार पडली तेव्हा सुद्धा सदरील मुद्द्यावर चर्चा करण्यात आली होती.नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी झालेल्या एकुण सहा आत्महत्या पैकी पाच जणांना प्रत्येकी दहा लाखाचे आर्थिक सहाय्य अगोदरच देण्यात आले होते फक्त एकमेव म्हणजे स्व.साईनाथ टर्के यांच्या परिवाराला देणे बाकी होते.
मागील काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सदरील मुद्द्याचा पाठपुरावा करून तो निकाली काढण्यात आला व आज रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्रीयुत विकास माने साहेब व नांदेड तालुका तहसीलदार तथा दंडाधिकारी श्रीयुत वारकड साहेब यांच्या हस्ते स्व. साईनाथ टर्के यांच्या परिवाराला रुपये दहा लाखाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपस्थित मंडळाधिकारी अनिल धुळगंडे, तलाठी पिंगळे सर,मराठा सेवक श्याम पाटील वडजे,मयत साईनाथ चे आई वडील आणि पत्नी उपस्थित होते.