नांदेड/किनवट। किनवट तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या मौजे घोटी येथील दलित वस्ती विकासासाठी मिळालेला दलित वस्ती विकास निधी हा सवर्ण वस्तीत वापर करून दलित समाजावर होत असलेल्या अन्याय तसेच जुन्या रस्त्यावर सदरील बोगस काम करत असल्या बाबत निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच बालाजी प्रल्हादराव पावडे यांनी मा.सहायक जिल्हाधिकारी साहेब किनवट, मा.मुख्याधिकारी मॅडम जिप नांदेड आणि मा.गट विकास अधिकारी साहेब, पंचायत समिती कार्यालय किनवट यांना दिले आहे.
सदरील प्रकरणी सविस्तर वृत्त असे की, सन २०२२-२३ या चालू वर्षांत मौजे घोटी येथे दलित विकासासाठी शासनाचा लाखो रुपयाचा निधी मिळाला आहे. पण या योजनेचा पूर्ण खर्च हा ९० टक्के गैर दलित वस्ती मध्ये झालेला आहे, संबंधित सरपंचाने दलित वस्ती कामाचा ठराव हा दलित वस्ती मध्ये न घेता गैर दलित वस्तीत कामाचा ठराव घेतलेला आहे.ज्यामुळे दलित समाजावर अन्याय झाला आहे.घोटी ग्रामपंचायत मधे काम करणारे गुत्तेदार हे प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी प्रमाणे काम करत नाही.काही लाचखोर अधिकार्यांशी हाताशी धरून सबंधित गुत्तेदार गैर दलित वस्तीत काम केलेले आहे.
सबंधित कामाचे अधिकारी शाखा अभियंता व कार्यकारी अभियंता हे कामाची स्थळ पाहणी न करता मुल्यांकन व मोजमाप पुस्तिका बनवतात. मा.गटविकास अधिकारी हे दलित वस्ती विकास कामा संदर्भात चौकशी न करता गाव भेट न देता गुत्तेदार यांच्या सांगण्यावरून परस्पर मोजमाप पुस्तिकेवर सह्या करतात.या कामाची सबंधित अधिकार्यांनी सखोल पारदर्शक चौकशी करूनच देयके आदा करण्यात यावेत, असे न झाल्यास दलित समाजासह शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी घोटी ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता पं.स. किनवट, गट विकास अधिकारी यांना जबाबदार ठरवून यांच्यावर कठोर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी व या प्रकरणी गट विकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घेतली नाही तर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांच्या दालनासमोर उपोषनास बसणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.याबाबत गट विकास अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत मी व्यक्तिशः लक्ष्य देत आहे आणि सदरील प्रकरणी चौकशी आमचे विस्तार अधिकारी आणि शाखा अभियंता हे करतील त्यानंतर आम्ही योग्य तो निर्णय घेवूत असे फोन वरती सांगितले.