नायगांव, रामप्रसाद चन्नावार। तालुक्यातील गडगा येथील रस्त्यालगत होत असलेल्या पेट्रोल पंपावर अनधिकृत पणे अंदाजे 450 ब्रास मुरूम टाकल्याप्रकरणी सदर शेतीवर तब्बल 22 लाखाचा बोजा टाकण्याचा आदेश तहसीलदार मंजुषा भगत यांनी दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष साईनाथ कांबळे जिगळेकर यांनी नायगाव तहसीलदार यांना गडगा येथे होत असलेल्या पेट्रोल पंपावर अवैध मुरूम टाकण्यात आला आहे, त्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यासह सदर शेतीच्या गट क्रमांक २७९ वर बोजा टाकण्यात यावा असे तक्रारी निवेदन २५/०७/२०२३ रोजी दिले होते. त्यावर तहसीलदारांनी गडगा-मांजरम येथील तलाठी-मंडळ अधिकारी यांचा जायमोक्यावरील संयुक्त पंचनामा मागविला असता सदर ठिकाणी 450 ब्रास अवैध मुरूम साठवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
यावर संबंधित शेत गट क्रमांक 279 चे मालक मन्मथ कस्तुरे यांना खुलासा मागविला असता त्यांनी अद्याप उत्तर दिले नसल्याने दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी तहसीलदार भगत यांनी गडगा येथील गट क्रमांक 279 यावर शासन निर्णय नियमानुसार बावीस लाख पन्नास हजार रुपये बोजाची नोंद संबंधिताच्या नावे घेऊन अनुपालन अहवाल कार्यालयास सादर करण्याचा आदेश संबंधित तलाठी मंडळ अधिकारी यांना दिला आहे. यामुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
“मी गेल्या चार महिन्यापासून केलेल्या पत्रव्यवहारास किंबहुना पाठपुराव्यास आज तहसीलदार यांनी बोजा चढवण्याचा आदेश देऊन शासनाचा बुडणारा लाखो रुपयांचा महसूल भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. मी यावर न थांबता शासनाचा महसूल बुडवून पेट्रोल पंप टाकणाऱ्यांच्या विरोधात थेट मंत्रालयापर्यंत लढा देईन”….. तक्रारदार साईनाथ कांबळे जिगळेकर, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष नांदेड.