तरुणांनी एका गोष्टीचा ध्यास न धरता अष्टपैलू असले पाहिजे – खासदार हेमंत पाटील
उमरखेड, अरविंद ओझलवार| देशात आजमितीस बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्या हाताला काम नाही. कारण प्रशिक्षित नसल्याने व एका गोष्टीचा ध्यास धरत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून तरुणांनी एकाच गोष्टीचा ध्यास न धरता जीवनात अष्टपैलू गुण संपादित केल्यास जीवनाला महत्त्व प्राप्त होते. असे प्रतिपादन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी केले. ते उमरखेड येथे जिल्हा परिषद हायस्कूल प्रांगणात गोदावरी फाउंडेशन व भाजपा सेना महायुती द्वारा आयोजित भव्य नोकरी महोत्सव व रोजगार मेळाव्याच्या मंचावरून उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते .
यावेळी मंचावर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी जि प सदस्य चितंगराव कदम, गोदावरी पतसंस्थेचे अध्यक्ष राजश्रीताई पाटील, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख प्रवीण पाटील मिराशे, हदगाव तालुका प्रमुख विवेक देशमुख, हिमायतनगर तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, संतोष जाधव, सविता ताई कदम, आशाताई कलाने, कपिल चव्हाण, अतुल मैद, गजानन सोळंके यासह हिंगोली लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभेतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नौकरी महोत्सव तथा रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सचिन साठे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना हेमंत पाटील म्हणाले कि, जास्त लोकसंख्या असलेला भारत देश असून, ही देशाची ताकद आहे. ही ताकद व्यवस्थित वापरल्यास देश जगात महासत्ता होऊ शकते आणि हे मोदीजींचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. बेरोजगार युवकांनी आयुष्याचा उद्देश व दिशा ठरवली पाहिजे त्यामुळे यश हमखास मिळते, यासाठी कौशल्य शिक्षणावर जास्तीत जास्त भर देण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले . यावेळी भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी ग्रामीण भागातील युवकांना नोकरी मिळवण्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी येतात. त्या अडचणी येऊ नये यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगून तरुणांनी मुलाखतीला सामोरे जाताना आत्मविश्वास ठेवून सामोरे गेल्यास यश हमखास मिळते असे त्यांनी सांगितले.
यावेळी चितंगराव कदम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून तरुणांना यथोचित मार्गदर्शन केले. सदर मेळाव्यात अकरावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, इंजीनियरिंग, पदवीधर, अग्रिकल्चर, नर्सिंग व एमबीए झालेल्या तरुण – तरुणीच्या मुलाखती छत्रपती संभाजी नगर, पुणे, अहमदनगर, नागपूर येथील आलेल्या 70 कंपन्यांच्या स्टॉप ने घेतल्या. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अविनाश कदम यांनी केले तर आभार कपिल चव्हाण यांनी मानले.