आर्टिकलनांदेड

मोदींच्या विकासात्मक चेहऱ्याला मराठवाडा साथ देणार का?

‘अबकी बार, ४०० पार ‘ हा नारा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील प्रत्येक लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीवर विशेष लक्ष ठेवून आहेत. महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या १३ सभा झाल्या. एकूण १८ ते २० सभा महाराष्ट्रात घेण्याचे नियोजन मोदींनी आखले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यातील लातूर व धाराशिव या दोन लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी निवडणुका होणार आहेत. भाजप व मित्रपक्षांना जास्तीत जास्त जागा निवडून आणायच्या आहेत . त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा हे दोघेही दिग्गज नेते जंग जंग पछाडत आहेत . त्याचा प्रत्यय मराठवाड्यातील लातूर व धाराशिव लोकसभा मतदारसंघात आयोजित केलेल्या सभेतून दिसून आला. या दोन्ही मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली जाहीर सभा भाजपला तसेच मित्रपक्षांना पाठबळ देणारी ठरली. मोदींच्या विकासात्मक चेहऱ्याला लातूर तसेच धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी उत्साहात प्रतिसाद दिला. तर दुसऱ्या बाजूने लातूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी प्रियंका गांधी यांची उदगीर येथे सभा पार पडली.

भाजप व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या सभांमुळे लातूर व धाराशिव येथील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे मंगळवार दिनांक ७ मे रोजी होणाऱ्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील मतदानाला चांगलाच प्रतिसाद मिळेल , अशी अपेक्षा आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे समर्थक आ. राणा जगजीत सिंग पाटील यांच्या सुविद्य पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली . त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. धाराशिव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांनी शेवटच्या टप्प्यात अर्चना पाटील यांच्यासाठी चांगलीच शक्ती पणाला लावली आहे. सुरुवातीला त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी बरेच प्रयत्न केले.

परंतु अखेरच्या टप्प्यात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सोडण्यात आली . त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांच्यापुढे तगडे आव्हान उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी घेतलेला पुढाकार या दोन्ही बाबी अर्चना पाटील यांच्यासाठी समाधानकारक ठरल्या आहेत. विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देखील सभा घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तसेच राज्यातील शिंदे व फडणवीस गटावर चांगलीच टीका केली. धाराशिवचे मतदार कोणाच्या पारड्यात मते टाकतील हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.पूर्वीपासून धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा बाळासाहेब ठाकरेंना मानणारा असल्यामुळे मतदारांनी ओमराजे निंबाळकर यांना पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

लातूर लोकसभेने यापूर्वी देशाला लोकसभा ‘स्पीकर’ दिला. देशाला गृहमंत्री व राज्याला तीन मुख्यमंत्री दिले आहेत. तसे पाहिले तर लातूर लोकसभा मतदारसंघ पूर्वीच्या काळात काँग्रेसच्या ताब्यात होता. परंतु गेल्या दहा वर्षांपासून या ठिकाणी भाजपने लोकसभेवर विजय मिळविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणाऱ्या मतदारांनी देशमुख कुटुंबीयांचा हा गड भाजपच्या ताब्यात दिला.
मराठवाड्यातील नांदेड लोकसभा मतदारसंघ जसा राज्याच्या पर्यायाने देशाच्या नकाशावर आहे, तसाच इतिहास लातूर मतदारसंघाचा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख, डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर तसेच संसदेचे लोकसभेचे स्पीकर (अध्यक्ष) , देशाचे गृहमंत्रीपद भूषविलेले शिवराज पाटील चाकूरकर यांचा हा मतदार संघ होय. सतरा लोकसभा निवडणुकीत १३वेळा काँग्रेस, तीन वेळा भाजपा व एकदा शेकाप पक्षाने लातूरमध्ये विजय संपादन केला आहे . २००९ ते २०२४ या निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी लातूर लोकसभा मतदार संघ राखीव झाला .

लातूर लोकसभा मतदार संघात ७ में रोजी मतदान होत आहे. या ठिकाणी १९ लक्ष ७७ हजार मतदार आहेत. १९६२ ते १९७१ या तीन व २००९ ते २०२४ या चार अशा सात निवडणूकीत अनुसूचित जातीसाठी हा मतदार संघ राखीव झाला.१९६२ ते २०१९ या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत तीन वेळा भाजपा व एक वेळा शेकाप विजयी झाले. मराठवाड्यात पर्यायाने राज्याच्या राजकारणात देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर , डॉ.शंकरराव चव्हाण यांना देशाचे गृहमंत्री’ होण्याचा बहुमान मिळाला. लातूरमध्ये चाकूरकर यांचा २००४ मध्ये भाजपाच्या रुपाताई दिलीपराव निलंगेकर यांनी पराभव केला. व त्यानंतर २००९ मध्ये हा मतदार संघ राखीव झाला. या मतदार संघाने डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (१९८६), स्व. विलासराव देशमुख (१९९९-२00३ व (२00४ ते २००८) असे तीन वेळा राज्याला मुख्यमंत्री म्हणून दिले आहेत. सलग सातवेळा विजय संपादन करणारे शिवराज पाटील चाकूरकर हे दहाव्या लोकसभेचे (१९९१ ते १९९६) अध्यक्ष होते. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ते राज्यसभेवर गेले . आणि पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या काळात २००४ते २००८ या काळात देशाचे गृहमंत्री झाले.

१९६२ ,१९६७, १९७१ या तीन लोकसभा (एससी राखीव) निवडणुकीत तुळशीराम दशरथ कांबळे (काँग्रेस) विजयी झाले तर २००९- जयवंत आवळे (काँग्रेस) – २०१४ – डॉ.सुनील गायकवाड (भाजपा) २०१९ – सुधाकर श्रुंगारे ( भाजपा ) हे विजयी झाले आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा खा. सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा झाली. तेव्हापासून पुन्हा एकदा लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपला चाहणारे मतदार प्रचंड संख्येने वाढले आहेत. लातूर लोकसभा निवडणूकीच्या इतिहासात विद्यमान खासदार व भाजपा उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांनी मताधिक्याचा ” विक्रमी’ विजय मिळविला होता. त्यांना २०१९ मध्ये ६ लक्ष ५७ हजार ५९० मते तर मच्छिंद्र कामत यांना ३ लक्ष ५० हजार ८३५ मते मिळाली. २ लक्ष ८६ हजार ७५५ मताधिक्याने भाजपचे शृंगारे लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासात्मक चेहरा मराठवाड्यातील मतदारांना पुन्हा एकदा आकर्षित करत आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ . शिवाजी काळगे यांच्यासाठी प्रियंका गांधी यांची उदगीर येथे जाहीर सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तुलनेत प्रियंका गांधी यांची सभा फेल झाली. त्यामुळे मराठवाड्यातील लातूर व धाराशिव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा ‘अबकी बार ४०० पार ‘ या आवाहनाला मतदार साथ देतील, अशी भाजप समर्थकांना अपेक्षा आहे. तर मोदीला कंटाळलेल्या मतदारांना काँग्रेसकडे वळण्यासाठी एक संधी निर्माण झालेली आहे त्यामुळे भाजप तर उमेदवारांना मतदार विजयी करतील, असा विश्वास काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वाटत आहे.

लेखक…. डॉ. अभयकुमार दांडगे, abhaydandage@gmail.com, नांदेड

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!