नांदेडलाईफस्टाईल
तळपत्या उन्हात हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळच्या माळरानावर डोलू लागली हिरवीगार वृक्षराजी

हिमायतनगर,अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर वनविभागाअंतर्गत तालुक्यातील मौजे मंगरूळ बीटमध्ये येणाऱ्या माळरानावर वनविभागाने वृक्षलागवड करून जोपासना केली आहे. सध्याच्या 43 अंश सेल्सियसच्या तापमानात देखील लागवड केलेली वृक्ष वाऱ्यावर डोलू लागली असून, परिसर हिरवाईने नटल्यांचे हिरव्या रोपांच्यापरिस्थिती वरून दिसून येत आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे शासनाच्या वनविभागाने जारी केलेल्या वनीकरण वाढ योजनेअंतर्गत सण 2023 मध्ये वीस हेक्टर वनपरिक्षेत्रात 32 हजार रोपांची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये साग, कडुलिंब, जांभूळ, बांबू , वड, पिंपळ, सिताफळ यासह अन्य प्रजातींच्या रोपांची लागवड हिमायतनगर वनपरिक्षेत्रांतर्गत करण्यात आली होती. पावसाळ्यात लागवड झालेल्या वृक्षांच संगोपन करण्यात वनविभागाने प्रामाणिकपणे काम करत डिसेंबर मध्ये देखील उन्हाच्या तीव्रतेने वृक्षांची वाढ व्हावी यासाठी अथक परिश्रम घेतले.

नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक भीमसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी बालाजी चव्हाण यांच्या आदेशानुसार हिमायतनगर येथील वन परिमंडळ अधिकारी अमोल कदम यांनी वनमजूर शेख अहमद, प्रकाश मेंडके ,नामदेव परमिटवार यांच्या मदतीने येथून वाहणाऱ्या पैनगंगा नदीचे पाणी शेतकरी व ग्रामस्थांच्या मदतीने मोटार पंपाच्या सहाय्याने श्रमदानातून उपलब्ध करून वाळू लागलेल्या वृक्षांची जोपासना केली. यामुळे पावसाळ्यात लावलेल्या रोपांना जीवनदान मिळालं असून, रोपांची चांगली वाढ होऊन माळरानावर वृक्षराजी वाऱ्यावर डोलू लागली आहेत. सध्या हिमायतनगर तालुक्यात 43 अंश सेल्सियस तपमान असून, या कडाक्याच्या उन्हांत देखील हिरवीगार झाड दिसत असल्याने वनविभागाने राबविलेल्या उपक्रमाचे वन्यप्रेमी नागरिकांतून अभिनंदन केले जाते आहे.
पर्यवरणाचा समतोल राखण्यासाठी मोठी मदत होणार – वनपाल अमोल कदम
वृक्षलागवड करण्यापूर्वी सर्व माळरानावर खडक होता, आजघडीला यांच ठिकाणी चांगली वृक्षवल्ली वाढली असून, हजारो झाडे येथे वाऱ्यावर डोलत असल्याने पर्यवरणाचा समतोल राखण्यासाठी मोठी मदत होणार आहे. यंदा देखील पावसाळ्यात वृक्षारोपण होऊन पर्यावरण वाडीसाठी प्रामाणिक प्रयत्न करून हिमायतनगर तालुका हिरवागार करू असा आत्मविश्वास वनपाल अमोल कदम यांनी सांगितले.
