गर्भधारणापूर्व माता व २ वर्षापर्यंतच्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘वात्सल्य’ उपक्रम
मुंबई| सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून गर्भधारणापूर्व माता व २ वर्षापर्यंतच्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘वात्सल्य’ या नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. जननक्षम माता (गर्भधारणेपूर्वीच्या), प्रसूतीपश्चात माता व २ वर्षापर्यंतची बालके यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. याविषयीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून माता-भगिनींच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागाने माता सुरक्षित तर घर सुरक्षित, बालकांच्या आरोग्यासाठी जागरूक पालक-सुदृढ बालक तसेच पुरुषांच्या आरोग्यासाठी निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे या योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. या योजनेला जनतेचा सहभाग लाभल्याने त्या यशस्वी ठरल्या आहेत. मेळघाट तसेच राज्यभरात दौरा करताना प्रा. डॉ. सावंत यांना गर्भधारणापूर्व मातांची समस्या लक्षात आल्यानंतर यासंदर्भात योजना राबविण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार ‘वात्सल्य’ ही नवीन योजना राज्यभरात लागू करण्यात येत आहे.
माता आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रसूती दरम्यान आणि प्रसूतीनंतर माता व बाल संगोपनाच्या विविध योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविल्या जात आहेत. नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या ‘वात्सल्य’ या उपक्रमाअंतर्गत महिलांच्या गर्भधारणेपूर्वी ते शिशू २ वर्षाचे होईपर्यंत आवश्यक सर्व गुणात्मक आरोग्य सेवांचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. या उपक्रमामध्ये प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तसेच शिशू २ वर्षाचे होईपर्यंत सर्व महत्त्वपूर्ण आरोग्य निर्देशांकावर सात्यत्यपूर्ण लक्ष ठेवून लाभार्थ्यांना आवश्यक आरोग्य सेवा मिळण्यासाठी विशेष नियोजन आहे. या उपक्रमामुळे जननक्षम जोडप्यांना आरोग्यामध्ये सकारात्मक बदल होवून कमी वजनाच्या बालकाच्या जन्माचे प्रमाण आणि जन्मतात व्यंग असलेल्या बालकांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. वात्सल्य उपक्रमात जननक्षम जोडपे व गर्भवती माता यांच्या आवश्यक चाचण्या करुन अतिजोखमीच्या मातांचे निदान होऊन त्यांच्यावर लवकर उपचार केले जातील तसेच बालकांच्या १००० दिवसापर्यंत वाढीचे मूल्यमापन करण्याकरिता आवश्यक सेवा प्रदान केल्या जातील.
कमी दिवसांचे आणि कमी वजनांच्या जन्माचे प्रमाण कमी करणे, जन्मतः विकृतीचे प्रमाण कमी करणे, उपजत मृत्यू प्रमाण कमी करणे, निरोगी गर्भधारणा आणि प्रसूतीसाठी माता आरोग्यात सुधारणा करणे, गर्भधारणेपूर्वीच मातेच्या आरोग्याची जोखीम ओळखणे व पाठपुरावा करणे, बालकाच्या हजार दिवसाच्या वाढीची सातत्यपूर्ण देखरेख करणे, अशी हा नवा उपक्रम राबविण्यामागील उद्दिष्ट्ये आहेत. कुटुंब नियोजन साधन न वापरणारी असुरक्षित जननक्षम योग्य जोडपी, प्रसूतीपूर्व कालावधीतील माता आणि गरोदर महिलांच्या सहवासीत सोबत करणारी व्यक्ती, दोन वर्षाखालील शिशु या योजनेचे अपेक्षित लाभार्थी असतील.
या कार्यक्रमाअंतर्गत निर्धारित आरोग्य सेवा – या योजनेंतर्गत प्राधान्याने गर्भधारणापूर्व आरोग्य तपासणी सेवांचा अंतर्भाव असून प्रचलित इतर आरोग्य कार्यक्रमांशी संलग्नित केलेले आहे. कुटुंबनियोजन साधन न वापरणारी असुरक्षित जननक्षम जोडपी यांची तपासणी, उपचार आणि समुपदेशन, माता व बालकांना आरोग्यासाठी असलेली जोखीम ही गर्भधारणा पूर्व, प्रसूती दरम्यान आणि प्रसूतीनंतर कालावधीत ओळखणे व त्यांचे प्रभावी व्यवस्थापन, मातांची वजन वाढ आणि बालकांची योग्य वाढ यावर नियमित देखरेख, विशेष शिशू लक्ष जन्मतः तात्काळ स्तनपान, जन्म ते सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान आणि सहा महिन्यानंतर योग्य पूरक आहार याबाबत सनियंत्रण, बालकांच्या वजन वाढीचे वाढीच्या आलेखाद्वारे सनियंत्रण, आरोग्याचे इतर कार्यक्रम उदाहरणार्थ मा (MAA), दक्षता (DAKSHATA), एच.बी.एन.सी (HBNC), एच. बी. वाय. सी (HBNYC), पी. एम. एस. एम. ए (PMSMA), आर. के. एस. के (RKSK), इत्यादी कार्यक्रमांचे समन्वय, माता आणि बालकांच्या आरोग्याच्या सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी आयसीडीएस, डब्ल्यू सी डी, आदिवासी विकास विभाग व इतर विभागांचा सहभाग असणार आहे.