समाजकल्याण कार्यालय परिसरातील ओपन जिम व परिसर नागरिकांसाठी खुले करा-गजानन सावंत
नांदेड| समाजकल्याण कार्यालय, परिसर नांदेड परिसरात शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या योजनेअंतर्गत ओपन जिम लावण्यात आली आहे. मा. समाजकल्याण अधिकारी नांदेड यांच्या आदेशाने ही ओपन जीम बंदीस्त करण्यात आलेली आहे. ही ओपन जिम सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करावी. जेणे करून नांदेड-हिंगोली रोड बायपास असल्या कारणाने व्यायाम करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक या रोडवर खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. समोरून येणाऱ्या वेगवान वाहनामुळे अपघात होत आहेत.
या रोडवर सकाळी व्यायाम व योगा करण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा उपलब्ध नसल्यामुळे आपल्या कार्यालय परिसरात ओपन जिम व मोकळी जागा असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी येथील परिसर मोकळा करू द्यावा, जेणे करून सकाळी 6 ते 8 या वेळेत व्यायामसाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा होईल, अशी मागणी नांदड शहर युवक काँग्रेसचे शहर जिल्हा प्रवक्ते गजानन सावंत यांनी सामाजीक न्याय भवन येथील सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदरील निवेदनाच्या प्रती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ.बालाजीराव कल्याणकर, जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह सर्व संबंधीतांना देण्यात आल्या आहेत. सदरील जागा लोकहितासाठी उपलब्ध न करून दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.