नवीन नांदेड भागात नव्याने तालुका स्तरीय श्रेणीचे रूग्णालय निर्माण करा – माजी नगरसेविका सौ वैजयंती गायकवाड

नवीन नांदेड। जिल्हयाच्या आरोग्य व्यवस्थेवरचा रुग्णाचा ताण कमी करण्यासाठी नांदेड दक्षिण भागात तालुका स्तरीय श्रेणीचे रुग्णालय निर्माण करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कडे माजी नगरसेविका सौ. वैजयंती गायकवाड प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ते भि. ना. गायकवाड यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनात, नांदेड शहराची आजची लोकसंख्या सहा ते सात लाखाच्या जवळ आहे. नांदेड सह बाजुच्या लातुर, परभणी, हिंगोली येथील रुग्ण नांदेडच्या विष्णुपुरी स्थित डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय आणि जिल्हा सिव्हील रुग्णालयात येत असतात त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर रुग्णांच्या वाढत्या संख्येचा ताण येतो परिणामी रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा देण्यात अडचणी येत आहेत हे मागील काही घटनेवरुन सिध्द झाले आहे.
त्यामुळे नांदेड महापालिकेच्या सिडको नांदेड दक्षिण भागात तालुकास्तरीय श्रेणीचे बाहय रुग्णालय स्थापन करणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या आरोग्य व्यवस्थेवर वाढत्या रुग्ण संख्येचा येणारा ताण कमी होऊन रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देता येईल अशी निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे.
सिडको नांदेड दक्षिण भागात नांदेड महापालिकेच्या अंतर्गत किंवा जिल्हा आरोग्य व्यवस्थे अंतर्गत तालुकास्तरीय श्रेणीचे सर्व सुविधायुक्त बाहय रुग्णालय, व आवश्यक असलेले मनुष्यबळ मंजुर करुन नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करावा असे निवेदनाद्वारे आयुक्त मनपा, नांदेड,दक्षिण विधानसभा मतदारसंघ आमदार मोहनराव हंबरडे यांना दिला आहे.
