नांदेड| नाटक म्हणजे समाजाचा आरसा, समाजातील चांगल्या, वाईट, रूढी, परंपरा हे नाटकाच्या माध्यमातून आपल्या समोर उभे रहात असते. असेच समाजातील वाईट परंपरा, गोष्टी विषयी आग्टं हे नाटक भाष्य करते. महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नांदेड केंद्रावर चौथ्या दिवशी कल्चरल असोसिएशन, नांदेडच्या वतीने अशोक बुरबुरे लिखित, डॉ. विजयकुमार माहुरे दिग्दर्शित आग्टं हे नाटक सादर झाले.
आग्टं म्हणजे आग्नी ठेवलेलं मडक, मृत्य व्यक्तीचा आप्त हे अग्नी ठेवलेलं मडके शिंक्यात ठेवून पुढे पुढे चालतो ही फार पुरातन प्रथा आहे. प्रेत जाळण्याच्या ठिकाणी अग्नी उपलब्ध होणे अशक्य होते त्या काळात अग्नी न्यावा लागे, अजूनही बरेच लोक अश्या अनेक गोष्टी पाळतात. नंतर त्या रूढी होतात आणि मग रूढीही गरजांची रूपे धारण करतात, अश्याच रुढींवर एका गरीब कुटुंबाची व्यथा यात मांडण्यात आली.
या नाटकात बाल कलावंत अथर्व देसाई यांनी साकारलेला सरावन हे पात्र लक्षवेधी ठरले तर विमल शेंडे, गणेश जेस्वाल, डॉ. विजयकुमार माहूरे, डॉ. राजेंद्र गोनारकर, सिद्धार्थ शिंदे, महेश अन्नपुरे, प्रकाश बोकारे, नितीन सोनकांबळे, संदेश राऊत, यांनी आप आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला. डॉ. मंदाकिनी माहूरे, सुजाता शिरसे, विद्या अंबोरे यांनी पत्रानुरुप भूमिका साकारल्या.
या नाटकाचे नेपथ्य डॉ.गजानन ढोले, संकेत आंबोरे यांनी वास्तववादी स्वरूपाचे साकारले तर पार्श्वसंगीत – अनिल लोने, प्रकाश योजना – सत्यपाल नरवाडे, रंगभूषा – सम्यक गोणारकर, वेशभूषा – शांती वैद्य यांनी साकारले.
या नाटकास प्रेक्षकांनी हाऊसफुल गर्दी केली होती. यावर्षीचे हाऊसफुल गर्दी करणारे हे दुसरे नाटक होते. प्रेक्षकांनी या नाटकात भर भरून प्रतिसाद दिला. क्वचितच एखाद्या स्पर्धेच्या नाटकाला अशी गर्दी होत असते आणि या नाटकाने हि गर्दी जमवली आणि त्यांची दादही मिळवली. आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी क्रांती हुतात्मा चरिटेबल, ट्रस्ट, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, विजय करभाजन दिग्दर्शित “गंमत असते नात्याची” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.