नांदेड। वाजेगाव शिक्षण विभाग (ता. नांदेड) यांच्या वतीने उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांच्या कल्पनेतून दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने बीट मधील उपक्रमशील शिक्षकांना शिक्षक भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार सौ. मेघा पोलावार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडी पुयड, श्री रामराव देशमुख मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिकूट आणि श्री रुपेश गाडेवाड, सहशिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वांगी यांना घोषित करण्यात आला आहे. लवकरच एका समारंभात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते या शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी तथा पुरस्कार संयोजक व्यंकटेश चौधरी यांनी दिली आहे.
ह्या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे हा सबंध जिल्ह्यातील कदाचित राज्यातील एकमेव बीट स्तरीय शिक्षक भूषण पुरस्कार आहे. ह्या पुरस्कारासाठी कुठलेही प्रस्ताव शिक्षकांच्या मार्फत मागविले जात नाहीत तर केवळ त्या त्या वर्षामध्ये ज्या शिक्षकांनी वैशिष्टयपूर्ण शैक्षणिक कार्य केलेले असते अशाच शिक्षकांची निवड ह्या पुरस्कारासाठी केली जाते. ह्या पुरस्काराचे मानकरी ठरविण्यासाठी पुरस्कार समिती गठित करण्यात आलेली आहे. ह्या पुरस्कार समितीतील केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, रामेश्वर आळंदे, मुख्याध्यापक बाबुराव जाधव, तुका पाटील, दत्तप्रसाद पांडागळे, अक्षय ढोके आदींनी या पुरस्कारासाठी उपक्रमशील शिक्षकांची निवड केली आहे.
हा पुरस्कार मिळविण्यासाठी वाजेगाव बीट मधील शिक्षकांमध्ये वर्षभर चुरस लागलेली असते. कोराना काळात मुलांचे शिक्षण चालू राहावे या तळमळीतून वाजेगाव बीट मधील शिक्षकांची धडपड पाहून सहायक शिक्षण संचालक डॉ. दत्तात्रय मठपती, शिक्षणाधिकारी डॉ सविता बिरगे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी कौतुक केले आहे. शाळा बंद असल्या तरी, गृह भेटी, शेतावर जाऊन, गावातील मंदिरासमोर, ग्रामस्थांच्या ओट्यावर मुलांना शिकवणे चालू होते. सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना व्हाटसपवर माहिती सूचना देऊन गुगल मीट, झूम, यूट्यूब या ऑनलाइन माध्यमातून शिक्षण चालू ठेवण्यासाठी अक्षर परिवारातील सर्व शिक्षक सतत कार्यरत राहिले होते. शिक्षकांना कार्यप्रेरणा देण्यासाठी दिनविशेषाचे औचित्य साधून शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी वेळोवेळी कौतुक पत्र, अभिनंदन पत्र देऊन शिक्षकांना प्रेरित केले आहे. या पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
वाजेगाव बीट अक्षर परिवार या नावाने सर्वदूर परिचित असून, शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी हे सातत्याने शिक्षकांना प्रेरणादायी उपक्रम देऊन शिक्षण चळवळ सक्रिय ठेवत असतात. बीटस्तरीय शिक्षक भूषण पुरस्कार हा शिक्षकांच्या कार्याचा गौरव आहे. डॉ. दत्तात्रय मठपती,* सहायक शिक्षण संचालक, लातूर