शिवणी ईस्लापुर परिसरातील शेतमजूर हजारोंच्या संख्येत तेलंगणात स्थलांतर

शिवणी, प्रकाश कार्लेवाड। किनवट तालुक्यातील शिवणी इस्लापूर परिसरात शेती साठी सिंचन सुविधा नसल्याने वाडी -तांड्यातील शेतकरी शेतमजूर वर्ग सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यात हजारोंच्या संख्येत स्थलांतर होताना दिसून आहे.याचे कारण या भागात सिंचन सुविधा नसल्याने शेतमजूर वर्गाच्या हाताला काम मिळत नाही.शासनाच्या राबविणाऱ्या रोजगार हमी योजना फक्त घरकुल पुरते राहिले तर प्रत्यक्षात रोजगार योजना ही नावालाच राहिली आहे.
नुकतीच दिवाळी संपली आता शेतमजूर कुटुंब आपल्या परीवारला सोबत घेऊन कामाच्या शोधात तेलंगाना राज्यात जाऊन कापूस वेचणीसह इतर काम करून रोजगार मिळवण्यासाठी शिवणी इस्लापुर भागातील शेतमजूर वर्ग हजारोंच्या संख्येने स्थलांतर होतांना दिसून येत आहे.यामुळे मात्र आता स्थानिक शेतकरी आता अडचणी येण्याची शक्यता आहे. याचे कारण शिवणी इस्लापूर परिसरात शेतकरी बांधवांची कापूस वेचणी अजून सुरू झाली नाही त्याआधीच मजूर वर्ग तेलंगणात शेती कामासाठी जात असून स्थानिक शेतकरी मजुरदारा अभावी संकटात अडकला आहे तर या भागात सिंचनाभवी शेतमजूर व शेतकरी पुढील काही महिने तेलंगणात जाऊन शेती कामे करतात.
स्वतंत्र भारतात ७५ वर्षानंतर सुद्धा गोरगरीब वंचित व शेतमजूर कुटुंबांना आपले गाव घरदार सोडून संसाराचा गाडा चालवण्यासाठी व पोटाची खळगी भरण्यासाठी इतर राज्यात जाऊन कामे करावे लागते ही शोकांतिकाच म्हणावे लागेल. याचे कारण राज्याची राजकीय उदासीनता म्हंटले तर वावगे ठरणार नाही.
निवडणुकांच्या तोंडावर अनेक योजनांचा व गरिबांना मुख्य प्रवाहात आणण्याचा पोकळ आश्वासने दिले जातात. तर घोषणांचा पाऊस पडतो पण तो प्रत्यक्षात सर्वसामान्य जनतेला लाभ मिळत नाही. यातून निराश्य निर्माण होऊन शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना आपले गाव व घरदार सोडून लहान लहान लेकरांना सोबत घेऊन थंडी उन्हात काम करण्यासाठी तेलंगाना राज्यात शेतीच्या कामाला जावे लागते. याचे कारण या भागात सिंचन सुविधा असल्या असते तर मजूर वर्गाच्या हाताला बारामाही काम मिळले असते. परंतु सिंचन सुविधा अभावी शेतकाम करणारे मजूर वर्ग दरवर्षी कापूस वेचणी सह ईतर शेतीचे कामे करण्यासाठी तेलंगणा राज्यात हजारोंच्या संख्येने स्थलांतर होत असते.हे काही नवीन नाही.तर दुसरीकडे या भागातील मोठ्या शेतकऱ्यांना कापूस वेचणीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागते. तर इतर शेतीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने स्थानिक शेतकरी संकटात आला आहे.
परराज्यात स्थलांतर होणाऱ्या शेतमजुरांचे कोणकोणते नुकसान. ? १) आपल्या मुलाबाळांचे शिक्षण रखडले जाणे २) स्वस्त धान्य दुकानात मिळणारे राशन पासून वंचित राहणे ३) महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयातून मिळणाऱ्या योजना व अंगणवाडीत मिळणारा पोषण आहारापासून वंचित ४) गावातील विविध घडामोडी पासून अनभिग्न ५) निवडणूक दरम्यान मतदान पासून वंचित ६) गर्भवती महिला दर महिन्याच्या आरोग्य तपासणी पासून वंचित ७) शुन्य ते सहा महिने व सहा ते दोन वर्षे या वयोगटातील नवजात बालकांची तपासणी जे की मानव विकास अंतर्गत राबविले जातात त्यापासून वंचित.
स्थलांतर होणारे शेतमजूर कोणते ?शेतीच्या उत्पादनांमध्ये शेतमजुरांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. एकूण गामीण लोकसंख्येत शेतमजुरांचे प्रमाण मोठे असते व त्यांची संख्या वेगाने वाढत गेलेली आढळते. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या ते मागासलेले असतात, त्यांचे शोषण होत असते व देशातील तो एक दुर्लक्षित गट म्हणून ओळखला जातो. त्यांचे साधारणपणे चार प्रकारांत वर्गीकरण केले जाते. पहिला, जमीनदार किंवा जमीनमालकाचे सेवक म्हणून काम करणारे भूमिहीन मजूर. दुसरा, इतर कोणत्याही शेतकऱ्याकडे पूर्णवेळ सेवा करणारे भूमिहीन मजूर. तिसरा, स्वतःची थोडीफार जमीन असणारे पण शेती परवडत नसल्याने वर्षातील बहुतेक काळ दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करणारे मजूर आणि चौथा, स्वतःची शेती कसून झाल्यावर वर्षातील काही काळ दुसऱ्याच्या शेतावर नोकरी करून पूरक उत्पन्न मिळविणारे शेतमजूर. यांपैकी कोणत्याही प्रकारात मोडणाऱ्या शेतमजूर व्यक्ती असल्या, तरी त्या सर्वांची समान वैशिष्टये म्हणजे अत्यल्प, बेभरवशाचे तसेच चढउताराचे उत्पन्न, समाजातील खालच्या स्तरावरील जीवन, सातत्याने होणारी पिळवणूक, मागासलेले राहणीमान, सार्वत्रिक बेरोजगारी, कर्जबाजारीपणा इत्यादी. त्यांच्यापैकी मोठे प्रमाण समाजातील मागास जाती, जमाती, आदिवासी अशा उपेक्षित वर्गांचे असते.
