
हिमायतनगर। हिमायतनगर येथील तालुका कृषी कार्यालयाला अधिकारी व कर्मचारी हे वारंवार दांडी मारत असल्याने कार्यालयांत शुकशुकाट जाणवत आहे. सध्या खरिपाची पेरणी नजीक आली असताना हे अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून कृषी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा स्वैराचार थांबवण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालावे. अशी मागणी शेतकरी करित आहेत.
खरिपाची पेरणी अगदीच तोंडावर आली असून शेतकऱ्यांना खरीप पेरणी साठी लागणारे बी बियाणे व रासायनिक खते कोणते वापरावे, या बाबतीत मार्गदर्शनाची खरी गरज असताना या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मात्र सातत्यानं कार्यालयाला जाणीवपूर्वक गैरहजर राहत आहेत. सद्यस्थितीत शेतकरी बी, बियाणे व रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी दुकानावर गर्दी झाल्याचे पहावयास मिळत असून कृषी दुकानदार शेतकर्याना चढ्या भावाने बी बियाणे व रासायनिक खतांची विक्री करीत असल्याची ओरड होत आहे. मात्र कर्तव्य तत्परता विसरलेले अधिकारी व कर्मचारी व त्यांची पथके बघ्याची भुमिका घेत असल्याचे ही शेतकऱ्यांतून बोलल्या जात आहे.

तालूका कृषी अधिकारी यांचा वचक तालुका कृषी कार्यालयात असलेल्या कर्मचाऱ्यांवर राहीली नसल्याचा प्रत्यय येथे पावलोपावली येत असल्याचे कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या अनुपस्थिती वरून दिसून येत आहे. तेव्हा या बाबींकडे जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांनी तात्काळ लक्ष पुरवून येथील अधिकारांच्या स्वैराचार्यावर वेळीच लगाम घालावा. तसेच कृषी दुकानावर सातत्याने भरारी पथकांची नजर ठेवून कृत्रिम टंचाई दाखवून शेतकर्याची होणारी अर्थिक लूट थांबवावी. अशी मागणी रस्ता भावात खते बियाणे मिळत नसल्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांतून पुढे आली आहे.
आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हिमायतनगर व तसेच हदगाव तालुक्यात बोगस बि. बियाणे व तसेच रासायनिक खतांची होणारी विक्री थांबून दर्जेदार बी बियाणे व रासायनिक खतांची उपलब्धता करून द्यावी. अशी मागणी निवेदन देऊन केली होती. अनेक ठिकाणी नामांकित कंपनीच्या बियाणांची कृत्रिम टंचाई दाखवून चढ्या भावाने विक्री होत असल्याचे शेतकऱ्यांतून सांगीतले जात असून, स्थानिक तालुका कृषी अधिकारी व पंचायत कृषी अधिकाऱ्यांची मेहेरनजर असल्याने की,काय ? कारवाई च्या नावाने नुसतीच बोंब सुरू आहे.
आदीलाबाद येथे मोठया प्रमाणावर बोगस बियाणे साठा पकडल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रमाणित व दर्जेदार बियाणे मिळत आहेत की..? नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे, शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे व खते मिळावे म्हणून जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यां समक्ष तपासणी करून दर्जेदार व रास्त भावात बियाणे मिळावे यासाठी प्रयत्न करणे आणि हिमायतनगर तालुक्यातील परवानाधारक कृषी संचालकांना किती बियाणे व खताचा साठा पुरवठा करण्यात आला याबत अवगत करून पारदर्शकता समोर आणणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया सधन शेतकरी तुकाराम मुधोळकर यांनी न्यूज फ्लॅशशी बोलताना व्यक्त केली आहे.
