
नांदेड| दि.27 व 28 डिसेंबर 2023 रोजी अविष्कार 2024 विद्यापीठ स्तरीय संशोधन स्पर्धा एमजीएम संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची संलग्नित असलेल्या एकूण वीस महाविद्यालयांनी त्यांचा सहभाग नोंदवला होता. पदवी व पदवी उत्तर स्तरातील एकूण 117 विद्यार्थ्यांनी सहा वेगवेगळ्या विभागात त्यांनी तयार केलेल्या संशोधनात्मक प्रकल्प सादर केले. अविष्कार 2024 मध्ये एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
दोन दिवस चाललेल्या या विद्यार्थ्यांचे प्रकल्पाचे मूल्यांकन करण्यासाठी विद्यापीठ स्तरीय परीक्षक नेमण्यात आले होते. महाविद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांचे, परीक्षकांचे तसेच एकंदरीत सर्व कार्यक्रमाचे अत्यंत सुरेख नियोजन केले होते.
दुसर्या दिवशी शेवटच्या सत्रामध्ये परीक्षकांतर्फे निकाल जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्र.कुलगुरू डॉ. माधुरी देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती. यासह डायरेक्टर इनोवेशन इंक्युबॅशन अँड लिंकेज, डायरेक्टर ऑफ स्कूल ऑफ फार्मसी, डॉ. वाधेर, डॉ.एम.के.पाटील डीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी, डॉ.डी.एम. खंदारे डीन कॉमर्स अँड मॅनेजमेंट, डॉ.चंद्रकांत बाविस्कर डीन इंटर डिसिप्लिनरी सायन्सेस, डॉ.के.ए. भोगले युनिव्हर्सिटी अविष्कार कॉर्डिनेटर, डॉ. निलेश देशमुख को-कॉर्डिनेटर, डॉ. आर.व्ही.क्षीरसागर को-कॉर्डिनेटर आदि सन्माननीय उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
तीन वेगवेगळ्या स्तरांमध्ये घेण्यात येणार्या अविष्कार 2024 या स्पर्धेमध्ये प्रथम जिल्हास्तरीय स्तरात एमजीएम संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान या महाविद्यालयाच्या 14 प्रकल्पांपैकी 12 प्रकल्पांची निवड विद्यापीठ स्तरीय स्पर्धांसाठी करण्यात आली होती. या 12 प्रकल्पापैकी विद्यापीठ स्तरीय स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या सात प्रकल्पांची पुढील म्हणजेच अंतिम राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. विद्यापीठ स्तरावर तीन प्रथम क्रमांक, तीन द्वितीय क्रमांक. व एक तृतीय क्रमांक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पटकावले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, डायरेक्टर डॉ.गीता लाटकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष कोटगिरे व समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यापीठ स्तरीय हा दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपूर्ण कार्यक्रमाचे महाविद्यालयीन स्तरावरील नियोजन विशाल पाठक, मुक्तार याकूब, राजेश कागणे यांनी पाहिले. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाची भूमिका बजावली.
