वृत्तपत्र विक्रेत्यांचे संघटन कौतुकास्पद – माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांचे गौरवोद्गार

नांदेड। मोठ्या कष्टाने स्वतःचा व्यवसाय सांभाळत केवळ स्वतःच्याच मागण्यांसाठी नाही तर इतर सामाजिक व विकासाच्या प्रश्नांवरील आंदोलनात वृत्तपत्र विक्रेते सहभागी होतात, हे नांदेड जिल्हा वृत्तपत्र विकास मंडळाचे संघटन कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष तथा माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी व्यक्त केले.
नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा 24 वा वर्धापन दिन व राष्ट्रीय वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.व्यंकटेश काब्दे हे होते. तर यावेळी दै.प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी, कामगार नेते ऍड.प्रदीप नागापूरकर, मराठवाडा साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष तथा साहित्यिक जगदीश कदम, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहेमद, उद्योजक गजानन काळे आदी उपस्थित होते. यावेळी कॉ.अनंतराव नागापूरकर पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार माधव अटकोरे यांना तर उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेता पुरस्कार हदगावचे सुनिल व्यवहारे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी डॉ.काब्दे म्हणाले की, संघटन शक्तीच्या जोरावर आपल्या मागण्या मान्य करुन घ्याव्याच लागतात. त्याचसोबत सामाजिक व विकासाच्या प्रश्नावर सर्व संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे. नांदेडची वृत्तपत्र विक्रेता संघटना यासर्व चळवळीत अग्रभागी असते याचे मला कौतुक वाटते. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची मागणी रास्त आहे. शासनाने याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शंतनु डोईफोडे यांनी वृत्तपत्र विक्रेता विकास मंडळ विक्रेत्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनासोबतच विविध उपक्रम राबवत असते. वृत्तपत्र व्यवसायात आज तज्ञ मनुष्यबळाचा तुटवडा आहे. तो भरुन काढण्यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले तसेच आजपर्यंत आम्ही संघटने सोबत होतो आणि पुढेही सोबतच राहू असेही यावेळी म्हणाले.
सोबत काॅ. अनंतराव नागापूरकर यांच्या विचाराने काम करते याचा अभिमान वाटतो. तर ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांनी ही संघटना कॉ.अनंतराव नागापूरकरांच्या उद्योगासोबतच कामगार वाचला पाहिजे या धोरणानुसार काम करत आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न जटील होत आहेत. त्यामुळे येणार्या काळात वृत्तपत्र वितरकांसह सर्वच क्षेत्रातील असंघटीत कामगारांनी संयुक्त लढा देण्याची गरज व्यक्त केली. तर फारुख अहेमद यांनी संघटनेने राजकारणापासून दूर राहू नये. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये सहभागी व्हावे. महापालिका व विधान परिषदेत असंघटीत क्षेत्रासाठी स्वीकृत सदस्य म्हणून घेण्याची मागणी करण्याची गरज आहे.त्याचसोबत निवडणुका लढविण्यासाठी देखील पुढे आले पाहिजे, असे मत व्यक्त केले. साहित्यिक जगदिश कदम यांनी दोन्ही पुरस्कार प्राप्तांच्या कार्याचा गौरव केला. आणि साहित्य संमेलनात वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न सर्वांसमोर मांडणार असल्याचे सांगितले.
यावेळी विजय जोशी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले,कार्यक्रमाचे प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली तसेच काॅ नागापूरकर यांचे विचाराने काम करत असल्याने संघटना मजबूत राहिल्याचे मत यावेळी व्यक्त केले तर आभार प्रदर्शन चंद्रकांत घाटोळ यांनी केले. यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या गुणवंत पाल्यांचा तसेच इतर क्षेत्रातील गुणवंताचा विशेष सन्मान करण्यात आला,सोबत व्यवस्थापनातील वितरण प्रतिनीधींचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
विशेष म्हणजे तीन सफाई कामगार जे रात्री शहरातील सर्व बाजारातील कचरा उचलण्याचे काम करतात त्यांचाही यावेळी कपड्यांची भेट देऊन सन्मान केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबु जलदेवार,गणेश वडगावकर, सत्यनारायण देवरकोंडा,अवधुत सावळे, श्यामसिंह चंदेल, बालाजी चंदेल, सरदारसिंह चौहाण,चेतन चौधरी, संदीप कटकमवार,व्यंकटेश अनलदास, सतीष कदम,बालाजी सुताडे, सुनिल व्यवहारे,अनंत संगेवार, बाबुराव बडुरे,भागवत गायकवाड, गजानन पवार,विनायक आंधे, अनुप ठाकुर,लखन नरवाडे,खय्युम पठाण, अवधुत पसलवाड, रामेश्वर पवार, शंकर हुस्से, गणेश जुजाराव, अशोक खुने यांनी परिश्रम घेतले.
