
नांदेड| माता रमाई आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर येथील बुद्धीस्ट रिसर्च फाऊंडेशन नांदेडच्यावतीने भव्य स्वरुपात एकदिवसीय रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने ३ डिसेंबर २०२३ रोजी शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात होणार्या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे आणि बुद्धीस्ट रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कोंडदेव हाटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी रमामाता आंबेडकर यांना त्यागमूर्ती म्हणून ओळखले जाते. त्यांच्या त्यागाला आणि जीवनकार्याला विशेष करुन अधोरेखित करण्याच्या हेतुने १२५ व्या जयंतीच्या औचित्याने सदरील महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवात निमंत्रीत कवींचे कवीसंमेलन, एकपात्री, रमाईच्या जीवन कार्यावर व्याख्यान, विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहर उमटविणार्या महिलांचा गौरव आणि सायंकाळी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायकांच्या गीत गायनांमधून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. देशभरात ऐतिहासिक ठरणार्या एकदिवसीय राज्यस्तरीय भरगच्च कार्यक्रमातून प्रबोधनात्मक मेजवाणी मिळणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन फाऊंडेशन व संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
