नांदेड| ज्येष्ठ पत्रकार स्व. सुधाकरराव डोईफोडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या सर्व अंगाना स्पर्श केला. समाजाचे प्रश्न ते आपल्या लेखणीद्वारे निर्भिडपणे मांडत असत, असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी केले.
सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव पुरस्कार व राज्यस्तरीय युवा पत्रकारिता पुरस्काराच्या वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरस्कार समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे हे होते. दै. प्रजावाणीचे मुख्य संपादक शंतनू डोईफोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार समितीचे प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, सूर्यकांत वाणी तसेच सीए प्रविण पाटील, डॉ. बालाजी कोंपलवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पिपल्स महाविद्यालयाच्या नरहर कुरुंदकर सभागृहात पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार दिवाकर देशपांडे यांना यंदाचा सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव पुरस्कार देऊन विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर यांच्याहस्ते गौरविण्यात आले. यावेळी बोलतांना डॉ. शशिकांत महावरकर म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकासाठी पत्रकारांचे योगदान असते. पत्रकार समाजाच्या संवेदना मांडण्याचे काम करीत असतात. ज्येष्ठ पत्रकार दिवाकर देशपांडे यांनी युद्ध भूमिवरचे प्रसंग लिहिले आहेत. आंतरराष्ट्रीय विषयावर त्यांचे लिखाण आहे.
पत्रकारितेत सुधाकररावांनी वेगळा मापदंड निर्माण केला. जे लोक समाजहितासाठी बोलतात. त्यांना भीती वाटत नसते, त्यामुळेच सुधाकररावांनी निर्भिडपणे प्रश्न मांडले. ते पत्रकारितेच्या क्षेत्रातील वटवृक्षच होते. पुरस्कारामुळे नवी उर्जा मिळते. त्यामुळे चांगले लिखाण करणार्या पत्रकारांना पुरस्कार देणे गरजेचे आहे, असेही महावरकर यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
यावेळी बोलतांना राज्यस्तरीय युवा पत्रकारीता पुरस्कार प्राप्त प्रियंका तुप्पे, यांनी सांगितले की, पत्रकार म्हणून आपली बांधिलकी वंचित, सोशित आणि आवाज नसलेल्यांशी असली पाहिजेत. सुधाकरराव डोईफोडे यांनी पत्रकारीतेच्या क्षेत्रात मुल्यांचा वारसा दिला, त्यांच्याच विचारांचा मी वारसदार आहे. ज्यांचा कोणी वाली नाही, त्यांचे प्रतिनिधीत्व पत्रकारांनी केले पाहिजे, असे माझे मत असून त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न मी करीत असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार दिवाकर देशपांडे यांनी ‘पश्चिम आशियातील स्फोटक स्थिती’ या विषयावर आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. पश्चिम आशियातील स्फोटक स्थितीचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो, याचे आकलन झाले पाहिजे, असे सांगताना ते म्हणाले की, हिंदी महासागरातील घडामोंडीचा भारतावर परिणाम होत असतो. राजकारणाच्या पलिकडे जाऊन परराष्ट्रीय धोरणाचा विचार केला पाहिजेत. भारताचे परराष्ट्रीय धोरण पूर्वी अलिप्ततावादी होते. आता ते स्वायत्त झाले आहे. त्यात फारसा बदल झालेला नाही. भारताविषयी पाकिस्तानचे परराष्ट्रीय धोरण कधीही बदलणार नाही. परंतु चीनचे काय? चीन सोबत सॉफ्ट वॉर आणि लष्करी सामर्थ्य या बाबतीत वेळोवेळी भारताने आपले सामर्थ्य दाखवून दिले आहे. पश्चिम आशियातील इस्त्राईलचा हल्ला तसेच इराणकडून दहशतवादी संघटनांना मिळालेले बळ यावरही दिवाकर देशपांडे यांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला. आपली लष्करी सामुग्री वाढावी आणि आर्थिक परिस्थिती सुधारावी, यासाठी पाकिस्तान अमेरिकेच्या अधिक जवळ जाऊ पाहत आहे, असेही त्यांनी सांगितले.