मोकाट जनावरांच्या बंदोबस्तसाठी कोंडवाडा उभारून जनावरांच्या मालकावर कार्यवाही करा – किरण बिच्चेवार
हिमायतनगर,अनिल मादसवार| नगरपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे, शहरातील गोवंश दगावत आहेत. असा आरोप सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. त्यामुळे प्रशासक राजमधील हिमायतनगर येथील नगरपंचायत चर्चेत आली आहे. असे असतानाही प्रभारी मुख्याधिकारी व प्रशासक शहरातील प्रमुख समस्येकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे शहरात मोकाट जनावरे आजारी पडून काहींचा मृत्यू देखील होतो आहे. तात्काळ या प्रकारावर आळा घालण्यासाठी नगरपंचातीने पाऊले उचलावी. अन्यथा सर्व मोकाट जनावरे आणि मृत झालेले गोवंश नगरपंचायत मध्ये आणून जमा करून आंदोलन केले जाईल असा इशारा विश्व् हिंदू परिषदेचे गोरक्ष विभाग प्रमुख किरण बिच्चेवार यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
हिमायतनगर शहराला नगरपंचायतीच्या दर्जा मिळून जवळपास दहा वर्षे होऊ लागली आहेत. या काळात पाच वर्ष काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता भोगली. मात्र नगरपंचायत स्तरावरून शहरातील नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षा देण्यास आणि मोकाट जनावरांच्या बंदोबस्त करण्यास असमर्थ ठरली आहे. पाच वर्षाचा कार्यकाळ संपूर्ण निवडणूक लागतील असे वाटल्यानंतर केवळ आपल्या स्वार्थासाठी काही पदाधिकाऱ्यांनी आरक्षण सोडतीवरून तक्रारी केल्याने निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत. परीणामी तीन वर्षे झाले अद्यापही येथील निवडणुका लावण्यात आल्या नसल्याने येथील नागरपंचायतीवर प्रशासक राज आहे. प्रशासक राज असले तरी शहरातील अनेक विकास कामे सुरु असून, त्या विकास कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत असल्याने याचा त्रास सर्वसामान्य जनतेला सहन करावा लागत आहे.
शहरातील विविध वॉर्डात अस्वच्छता, मोकाट जनावरांचा सुळसुळाट, मोकाट कुत्र्यांची वाढलेली संख्या, अनेक भागात अज्ञात आजाराने दगावणारी गोवंश व कुत्रे, दुर्गंधीयुक्त घाण व नालीतील पाणी मुख्य रस्त्यावर, खड्डेमय रत्स्यामुळे होणारे अपघात, अर्धवट नळयोजनेच्या कामामुळे निर्माण होत असलेली पाणी टंचाईची समस्या, पथदिव्यांचा प्रश्न, शहारत वाढत असलेले अतिक्रमण यासह अनेक समस्यांनी शहरातील नागरिकांना वेठीस धरले आहे. येथील नगरपंचायतीच्या कारभार प्रभारी मुख्याधिकारी सांभाळत असले तरी महिना पंधरा दिवसाला एक वेळा नगरपंचायत कार्यालयात येऊन केवळ सह्या मारून मलिदा लाटण्याचे काम करत असल्याचा आरोप शहरातील नागरिकांतून सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे.
नगरपंचायत प्रशासनावर त्यांची वचक नसल्याने या ठिकाणी कार्यरत असलेले अधिकारी देखील शहरातील स्वच्छता पाणीपुरवठा यासह इतर नागरी सुविधाकडे आणि शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे शहरातील ठिकठिकाणी चौका चौकात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, या ठिकाणी टाकण्यात येत असलेले शिळे अन्न आणि प्लास्टिक खाऊन अनेक जनावरे विविध आजाराला बळी पडत आहेत. त्यामुळे हिमायतनगर शहरात मागील आठ ते पंधरा दिवसांमध्ये पाच ते सहा जनावरे अज्ञात आजाराने व अपघाताच्या माध्यमातून दगावले असून, विविध जनावर दुर्धर आजाराने ग्रस्त होऊ लागली आहेत.
अनेक ठिकाणी असा प्रकार निदर्शनास आल्यानंतर गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आजाराने ग्रस्त जनावरांची माहिती दिल्यानंतर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने त्यांच्यावर उपचार केले. मात्र त्याचा काही एक फायदा या मोकाट जनावरांना झाला नाही त्यामुळे यातील काही जनावरे दगावले गेली आहेत. शहरातील मोकाट गोवंश आवर घालण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. त्यामुळे तात्काळ नगरपंचायत प्रशासनाने आपल्या कामांमध्ये सुधारणा करून गोवंश वाचविण्यासाठी आणि मोकाट जनावरांना आवर घालण्यासाठी उपाययोजना करायला हवे. जर या प्रकाराकडे नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले तर नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेवरून समोर आले आहे.
फेसबुक या सोशल मीडियावर वायरल झालेल्या गोवंश सुरक्षेच्या प्रश्नामुळे हिमायतनगर येथील नगरपंचायत चर्चेत आली असून, नागरपंचात म्हणजे फक्त कमाईचे ठीकाण झाले आहे. ईथे बदली करून या आणि कमाई करून जा…. असाच कित्ता अधिकारी गिरवीत आहेत. तर काही स्वार्थ पिपासु राजकारण्यांनी तर जनावरांचा कोंडवाडा विकुन खाल्ला आहे. त्यामुळे येथील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात नगरपंचायत सपशेल अपयशी ठरली असून, त्यामुळे दिवसेंदिवस मोकाट जनावरांचे संख्या वाढतच आहे. शहरांमध्ये जवळपास 500 शेळ्या, २०० कुत्रे आणि दीडशेच्या जवळपास मोकाट गाई वासरे व ३०० शेळ्यांचा वावर आहे. या मोकाट पशूंच्या वावरामुळे शहरातील व्यापारी नागरिक व परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
मागील काळात जिल्हाधिकारी महोदयाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून उपाययोजना करा अशा सूचना नगरपंचायतीला दिल्या होत्या. मात्र हिमायतनगर येथील नगरपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचांकाके दुर्लक्ष केल्यामुळे पादचाऱ्यासह शहरातील नागरिक शेतकऱ्यांना मोकाट जनावरांचा सामना करावा लागत आहे. आता तर हे मोकट जनावरे शहरातील दिसलेले अन्न खाऊन मृत्युमुखी पडत असल्याने हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या संदर्भात नगरपंचायतीच्या संबंधितांना संपर्क साधला असता त्यानं फोन उचलला नाही.
मोकाट जनावरांचा बंदोबस्तसाठी कोंडवाडा उपलब्ध करून जनावरांच्या मालकांवर कार्यवाही करा – किरण बिच्चेवार
नगरपंचायत ने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अगोदर संबंधित गोवंशाच्या मालकांवर प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० च्या अनुसार गुन्हे दाखल केले पाहिजेत. आणि सर्व बेवारस गोवंश जप्त करून कोंडवाड्यातच ठेवले पाहिजेत. यासाठी नगरपंचायतीने मागील काळात विकून खालेल्या कोंडवाड्याची चौकशी करावी आणि तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी येथे नवा कोंडवाडा उपलब्ध करून देऊन विविध ठिकाणच्या कचरा कुंड्यावरील शिळे अन्न व प्लास्टिक खाऊन आणि अपघाताच्या माध्यमातून मृत्युमुखी पडत आहेत. अश्या प्रकारे आपल्या जनावरांना मोकाट सोडणाऱ्या गोवंशाच्या मालकावर कलम HIJ या कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी विश्व् हिंदू परिषदेचे गोरक्ष विभाग प्रमुख किरण बीचेवार यांनी दिली आहे. अन्यथा यासाठी आम्हाला आंदोलनाचे हत्यार उपसून लढाई लढावी लागेल असा इशाराही दिला आहे.