“नवदुर्गा-जागर स्त्री शक्तीचा” या कार्यक्रमाद्वारे माहूर येथे महिलांच्या योजनांचा झाला जागर
नांदेड| महिलांना आर्थीक स्वालंबनासह विविध विकास प्रक्रियेत सहभागी होता यावे, या उद्देशाने शासनाने विविध योजना साकारल्या आहेत. या योजनांचा जागर त्यांच्यापर्यंत पोहोचावा या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत “नवदुर्गा-जागर स्त्री शक्तीचा” या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आज माहूर येथे करण्यात आले.
श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन माहूर तहसीलचे नायब तहसीलदार तथा नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी डॉ. राजकुमार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बळीराम पाटील मिशन मांडवीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव संध्याताई राठोड, छायाताई राठोड उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात जय जय महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताने करण्यात आली. मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर दुर्गे दुर्घट भारी या नयनरम्य नृत्याचा आविष्कार सादर झाला.
या कार्यक्रमात गोंधळ, जोगवा, भक्तिगीते, अभंग, लोकसंस्कृती व लोककलांचे दर्शन घडविणारे तसेच सरकारच्या विविध योजनांची नाटिकेमधून सविस्तर माहिती देण्यात आली. ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमातून जनजागृती करण्यात आली. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील आघाडीच्या कलाकारांना आपल्या नृत्य व अभिनय कलेचे दर्शन माहूरकरांना दिले. मयुरा परांडे व केतकी पालव यांच्या ‘लल्लाटी भंडार’ या भक्तीगीतावरील नृत्याला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या सर्व नृत्यांना विद्या वाघमारे व संदेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे संचालन पंढरीनाथ कांबळे अर्थात् पैडी कांबळे यांनी केले. त्यांनी प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे ज्ञानवर्धन करून पारितोषिक ही वाटले. यामध्ये माहूर मधील 14 महिलांनी व 2 पुरुषांनी अचूक उत्तरे देऊन पारितोषिक प्राप्त केले. कार्यक्रमाच्या सरतेशेवटी समन्वयकाची जबाबदारी सक्षमपणे निभावणाऱ्या भूषण देसाई यांचा व त्यांच्या सर्व चमूचा सत्कार संस्थेच्या सचिव संध्या राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.