हिंगोली। हिंगोली लोकसभेसाठी शिवसेना उमेदवार बदलला जाणार असल्याची माहिती शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे. हेमंत पाटील यांची उमेदवारी शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आली होती मात्र आता हिंगोली लोकसभेत उमेदवार बदलण्यात येणार आहे. हिंगोली लोकसभेसाठी हदगाव तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य माणूस बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हदगाव विधानसभा निवडणुकीत त्यांनी दोन्ही वेळा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती, परंतु हिंगोली लोकसभेचा शिवसेनेचा नवा शिलेदार कोण..? हे मुख्यमंत्री ठरवणार असल्याचे देखील आमदार संतोष बांगर म्हणाले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोहळी येथील रहिवासी असलेले बाबुराव कदम कोहळीकर यांनी १९८७ पासून राजकिय प्रवास सुरु केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी कोहळी गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक पद भुषविल, ग्रामपंचायत निवडणुकीत इस. सन.२००० मध्ये सरपंच झाले. नांदेड जिल्हयातील निवघा-तळणी जिल्हा परिषद गटातून ते सन २००२ मध्ये विजयी झाले. सन २०१२ पर्यंत त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिले आहे. तसेच शिवसेना नांदेड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी पार पाडली. तसेच सन २००९ मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर हदगाव विधानसभा निवडणुक लढविली होती. त्यावेळी त्यांना सुमारे ५२ हजार मतदान मिळाले होते. तर सन २०१९ मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुक लढविली त्यावेळीही त्यांना सुमारे ६२ हजार मतदान मिळाले. दोन्ही निवडणुकीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.
हिंगोली लोकसभा मतदार संघाची जागा शिवसेना (शिंदेगट) असल्यामुळे या ठिकाणी शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. मात्र भाजपाने त्यांच्या उमेदवारीला तिव्र आक्षेप घेतला. आणि नाराजी व्यक्त केली. महायुतीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये हिंगोलीची जागा धोक्यात असल्याचे लक्षात आल्यानंतर शिंदेसेनेने तातडीने उमेदवार बदलून त्या ठिकाणी आता हदगाव तालुक्यातील बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहिर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत किमान 50 हजार जनसमुदाय यांच्या साक्षीने शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार गुरुवारी दि. ४ अर्ज दाखल करणार असल्याचे संतोष बांगर यांनी सांगितले.