नांदेड| जिल्ह्यातील पी. एम. किसान योजनेतील बँक खाते आधार संलग्न नसलेले, ई-केवायसी प्रलंबित असलेले, स्वयं नोंदणी लाभार्थींची मान्यता प्रलंबित असलेले व स्टॉप पेमेंट केलेले लाभार्थी, भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करणे व गावातील नवीन पात्र लाभार्थ्यांची नोंदणी याबाबत 15 जानेवारी 2024 पर्यंत जिल्ह्यात संपृक्तता मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
या विशेष मोहिमेत आधार सिडींगसाठी पोस्ट खाते, सामाजिक सुविधा केंद्र (सीएससी) व बँक व्यवस्थापन यांचा प्रभावीपणे उपयोग करावा. तर ई-केवायसी करीता ग्रामस्तरी नोडल अधिकारी (व्हीएनओ) व सामाईक सुविधा केंद्र (सीएससी) यांच्या मार्फत कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (व्हीएनओ) नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक गावासाठी ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (व्हीएनओ) नियुक्त असणार आहेत. ग्रामस्तरीय नोडल अधिकारी (व्हीएनओ) म्हणून ग्रामपातळीवरील अधिकारी (कृषि सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक) नेमणूक करण्यात आली आहे.
बँक खाते आधार संलग्न नसलेले, ई-केवायसी प्रलंबित असलेले, स्वयंनोंदणी लाभार्थ्यांची मान्यता प्रलंबित असलेले व स्टॉप पेमेंट केलेले लाभार्थी, भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करणे व गावातील नविन पात्र लाभार्थ्यांची नोंदणी अशी सर्व कामे आता गावातच पूर्ण होतील त्यासाठी तालुका किंवा जिल्हा कार्यालयात जाण्याची गरज नाही, असेही प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे.
ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी खाजगी इमारत धारकांनी अर्ज करण्याचे आवाहन
जिल्ह्यातील कंधार, मुखेड व लोहा येथे संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींचे प्रत्येकी 1-1 वसतिगृह मंजूर आहे. ही वसतिगृहे भाड्याच्या इमारती घेवून सुरु करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने कंधार, मुखेड व लोहा या तालुक्याच्या ठिकाणी 100 विद्यार्थी क्षमता असलेल्या वसतिगृहासाठी सर्व सोयीयुक्त इमारती भाडयाने घेण्यात येणार आहेत. खाजगी इमारत धारकांनी आपल्या इमारती उपलब्ध सोयी-सुविधा, मालकी हक्काबाबतचे कागदपत्रे व इमारतीचे फोटोसह आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड यांच्याकडे 4 जानेवारी 2024 पर्यत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.
कंधार, मुखेड व लोहा या तालुक्याच्या ठिकाणी ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहे प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेची शासन निर्णय 15 जून 2021 अन्वये मंजूर करण्यात आलेली आहे. ही वसतिगृहे सुरु करण्यासाठी इमारती भाड्याने घेवून वसतिगृहे सुरु करण्याचे निर्देश आहेत. कंधार येथे मुलांचे 1 व मुलींचे 1 असे एकूण 2 आणि मुखेड तालुक्याच्या ठिकाणी मुलांसाठी 1 व मुलींसाठी 1 असे एकूण 2 वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. तर लोहा तालुक्याच्या ठिकाणी मुलांचे 1 व मुलींचे 1 असे एकूण 2 वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत.
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शुक्रवारी मुखेड व देगलूर येथे मेळावा
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाद्वारे स्वयंरोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी शुक्रवार 29 डिसेंबर 2023 रोजी पंचायत समिती सभागृह मुखेड व पंचायत समिती सभागृह देगलूर येथे सकाळी 10 वा. मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या तालुक्यातील पात्र व होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.
या मेळाव्यात कर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्ज अपलोड करणे, मंजुरीच्या प्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाचे अधिकारी तसेच बँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी अनुषंगिक व आवश्यक त्या कागदपत्रांसह या मेळाव्यास उपस्थित रहावे. तसेच कर्ज प्रस्ताव प्रलंबित असलेल्या अर्जदारांनीही आवश्यक त्या कागदपत्रासह/कारणासह पूर्ततेसाठी उपस्थित रहावे, असे कळविले आहे.
सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश कार्यक्रम शासनाने ऑगस्ट-2019 पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु केलेला आहे. सन 2023-24 नांदेड जिल्हयास एकुण 900 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्याचे महाराष्ट्र शासनाचे लक्षांक आहे.
मेळाव्यास येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, दोन फोटो, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, व्यवसायानुंषिक इतर परवाने ही आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. ही योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत असून अधिक माहितीसाठी सदर योजनेचे https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थळ आहे. तालुक्यातील व परिसरातील पात्र-होतकरु सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्यास उपस्थित राहून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.