
नांदेड| मागील अनेक वर्षांपासून विमानतळ बंद झाल्याने नांदेडमधून एअर इंडिया आणि ट्रूजेट या कंपन्यांची सेवा बंद झाल्यानंतर नागरी उड्डाण विभागाने येथील विमानतळाचा परवानाही रद्द केला होता. मात्र, २७ फेब्रुवारी पासून येथील विमानतळाला पुन्हा परवाना बहाल करण्यात आला आहे. आता नांदेडहून पुन्हा विमान उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. नागरी विमान उड्डाण विभागाच्या संचालकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात टेलिफॅक्स करून ही माहिती दिल्याने लवकरच दिल्ली व मुंबई येथे विमानसेवा सुरू होणार आहे.
२००८ मध्ये नांदेड येथील विमानतळ अद्ययावत होऊन येथून विमानसेवा सुरू झाली होती. परंतु अधून मधून ही सेवा खंडित झाली होती. दरम्यान, त्यावेळी केंद्र शासनाचा अंगीकृत उपक्रम असलेल्या एअर इंडिया या कंपनीने दिल्ली-नांदेड-मुंबई अशी सेवा सुरूकेली होती. तर हैदराबादच्या ट्रूजेट या कंपनीने हैदराबाद-नांदेड-मुंबई अशी सेवा सुरू केली होती. मात्र २०२१ मध्ये कोरोनामुळे ही सेवा बंद पडली होती. विमानसेवा बंद झाल्याने नांदेडकरांची मोठी गैरसोय झाली. देश-विदेशातील शीख भाविकांना नांदेड येथे सचखंड हुजूर साहिब गुरुद्वारा येथे मथ्था टेकण्यासाठी येणे शक्य होत नव्हते. मात्र आता विमानसेवा सुरु झाल्यामुळे प्रवाश्याना दिलासा मिळणार आहे.
लवकरच नांदेड येथून दिल्ली व मुंबई येथे विमानसेवा सुरू होईल, असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच पुणे व तिरुपती येथेही सेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
