उस्माननगर, माणिक भिसे| रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे जमिनी अनुत्पादक बनल्या आहेत.त्यामुळे मातीच्या जैविक गुणांचा ऱ्हास होत आहे,मातीच्या प्रदुषणात वाढ होत आहे .त्याचा परिणाम अन्नसुरक्षेवर झाल्याच दिसून येत आहे .मृदेच संरक्षण म्हणजे संपूर्ण सजीवांचा संरक्षण असून अन्न सुरक्षेसाठी माती महत्वाची असून तिचे संवर्धन ,जतन करा असे आवाहन जागतिक मृदादिन कार्यक्रमानिमित्य आयोजित कार्यक्रमात दिलीप दमय्यावर जिल्हा व्यवस्थापक नाबार्ड यांनी केले.
काटकळंबा तालुका कंधार येथे नाबार्ड च्या माध्यमातून एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल प्रकल्प प्रगतीपथावर असून दिनांक 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाच्या निमित्याने जनजागृती कार्यक्रम बाबुराव बस्वदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता . याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिलीप दमय्यावर जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड व सर्जेराव ढवळे कार्यक्रम व्यवस्थापक संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यांची उपस्थिती होती. पुढे बोलतांना दिलीप दमय्यावर यांनी अलीकडच्या काळात शेतीमध्ये वापरण्यात येणारी भरमसाठ रासायनिक खते ,शहरीकरणासाठी आणि उद्योग धंद्यासाठी करण्यात येणारी जंगलतोड आणि इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मानवाच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम पर्यावरणाचा ऱ्हास आणि अश्या प्रकारच्या इतर अनेक कारणांमुळे मृदेची झीज मोठ्या प्रमाणावर होतेय .केवळ एक इंच सुपीक मृदेच थर तयार होण्यासाठी आठशे ते हजार वर्षाचा कालावधी लागतो. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मृदा संवर्धन करणे हि काळाची गरज आहे ,याची जाणीव करून कृती करायला हवेत असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच रासायनिक खताचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे असे आवाहन त्यांनी केले.
काटकळंबा येथे नाबार्ड व अन्य यंत्रणेच्या माध्यमातून मृद व जलसंधारणाची अनेक उपचार पूर्ण झाले असून, गावकऱ्यांमार्फत चांगल्या पद्धतीने पाणलोट प्रकल्प राबविण्यात आला आहे, या पुढेही गावकऱ्यांनी माती व पाणी संवर्धन साठी अखंडपणे काम करावे,सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर करावा,रासायनिक सोबतच जैविक खताचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले. सर्जेराव ढवळे कार्यक्रम व्यवस्थापक यांनी जमिनीतील मुख्य अन्नद्रव्ये व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे महत्व सांगून जमिनीच्या आरोग्य पत्रिकेनुसार खताची मात्रा द्यावी असा सल्ला दिला.जमिनीचा पीएच व सेंद्रिय कर्ब व जमिनीतील जीवाणू साखळीचा कसा संबंध आहे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. रासायनिक खते व पाण्याचा अनिर्बंध वापर. आदी कारणांमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे असून जैविक खत.गांडूळ खत ,जीवामृत ,दशपर्णी आदीचा वापर शेतकऱ्यांनी वाढवावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक गंगाधर कानगुलवार, मोहन पवार सचिव जय शिवराय पाणलोट विकास संस्था , सदस्य गोविंदराव वाकोरे, अनिता राष्ट्रपाल चावरे,संजय गोविंदराव पानपट्टे, चक्रधर माधवराव गुरुजी, राष्ट्रपाल चावरे,शिवाजी परबता चोंडे, अर्जुन चावरे, गजानन बालाजी बस्वदे, नागोराव गणपती एकाळे, सुमित्राबाई भानुदास बस्वदे, अनुसयाबाई घंटेवाड, सुमित्राबाई प्रल्हाद बस्वदे आदी सह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय भिसे यांनी व उपस्थितांचे आभार गंगामणी अंबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जलदूत रामदास बस्वदे, किशन जाधव आदींनी परिश्रम घेतले.