संघ शक्ती व सज्जन शक्तीच्या एकत्रित कार्यामुळेच भारत विश्र्वगुरू होणार – डॉ. जयांतिभाई भाडेसिया
नांदेड| सध्याचे युग हे भारताचे युग असून जगभरात भारताचीच चर्चा सुरू आहे. भारत मोठ्या गतीने विश्र्वगुरु होण्याकडे मार्गक्रमण करत असून संघशक्ती व सज्जन शक्तीच्या एकत्रित कार्यामुळेच हे शक्य होत असल्याचे प्रतिपादन रा.स्व. संघाचे पश्चिम क्षेत्राचे संघचालक डॉ. जयंतिभाई भाडेसिया यांनी केले. ते रा.स्व. संघाच्या देवगिरी प्रांताच्या सामान्य संघ शिक्षा वर्गाच्या समारोप प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर देवगिरी प्रांत संघचालक श्री अनिल भालेराव, प्रमुख अतिथी ह भ प नारायण महाराज माधापुरकर, वर्गाधिकारी प्रा. उत्तमराव कांदे, किनवट जिल्हा संघचालक श्री संदीप जन्नावार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले.
डॉ. भाडेसिया म्हणाले, “वर्तमान भारत सर्व क्षेत्रात अग्रेसर होत आहे. भारताचा आयुर्वेद, योग, अध्यात्म जगाचे आकर्षण होत आहे. करोना काळात भारताने बनवलेली वॅक्सिन, चांद्रयान मोहीम, कलम 370, श्रीराम मंदिर उभारणी या सर्व गोष्टी नव्या शक्तिशाली भारताचा परिणाम आहे. दहशतवाद, पर्यावरण समस्या, कुटुंब व्यवस्था, आरोग्य समस्या अश्या अनेक जागतिक आव्हानांना समाधान भारतीय विचारात मिळत आहे. हा नवा भारत समाजाच्या एकत्रित परिणामामुळे घडत आहे” असे ते म्हणाले.
संघकार्य हे ईश्वरी कार्यच आहे – ह भ प नारायण महाराज माधापुरकर
संघ कार्य हे स्वार्थ रहित केलेले परमार्थ कार्य आहे. राष्ट्र धर्माला ग्लानी येते तेव्हा ईश्वर अवतार घेत असतो. लक्षावधी स्वयंसेवकांच्या माध्यमातून आज संघकार्य म्हणजेच ईश्वरीय कार्यच होत आहे. संघ कार्यामुळे समाजाला योग्य दिशा मिळत असून विद्वत समाजाला सुसंस्कार देण्याचं कार्य संघाच्या माध्यमातून होत असल्याचे वक्तव्य श्री नारायण महाराज यांनी केले. या वर्गाच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यामधील माधापूर येथील ह भ प श्री नारायण महाराज माधापूरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नारायण महाराज ग्रामस्वच्छता व हिंदुत्व जागरण या कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी हिंदू महिला जागृतीसाठी अनेक कार्यक्रम घेतले आहेत. तसेच तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती रुजवण्याचे कार्य निरंतर करत आले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी आवश्यक असणारे कार्यकर्ते शाखेच्या माध्यमातून तयार होत असतात. या शाखा तंत्राचे प्रशिक्षण व कार्यकर्त्यांचा गुणात्मक विकास दरवर्षी संघ शिक्षा वर्गातून होत असतो या वर्षीचा संघ शिक्षा वर्ग नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात चिखली येथे दिनांक 16 मे 2024 ते 1 जून 2024 या कालावधीत संपन्न झाला. या वर्गाच्या समारोप कार्यक्रमामध्ये ह भ प श्री नारायण महाराज माधापुरकर व प्रमुख वक्ते म्हणून पश्चिम क्षेत्राचे मा. क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया (मोरबी, गुजरात) हे उपस्थित होते.
दरवर्षी प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग या नावाने 21 दिवसांचा वर्ग होत असे, परंतु यावर्षीपासून नवीन संघ शिक्षा अभ्यासक्रमानुसार संघ शिक्षा वर्ग-सामान्य असा पंधरा दिवसांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. या वर्गामध्ये देवगिरी प्रांतातील म्हणजेच मराठवाडा व खानदेश या विभागातील 11 जिल्ह्यातून 168 इतक्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, मजूर, नोकरदार, व्यवसायी असे विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. या वर्गामध्ये शिक्षार्थी स्वयंसेवकांना शाखा संचालन, व्यायाम योग, दंड प्रहार, नियुद्ध, विविध खेळ यांचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच दररोज विविध सत्रामधून ग्रामविकास, व्यक्तिमत्त्व विकास, पर्यावरण रक्षण, गोसेवा, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, हिंदुत्व, स्वदेशी व सेवाभाव अश्या विविध विषयांचे बौद्धिक मार्गदर्शन सुद्धा देण्यात आले.
2878 घरातून 32 हजार चपाती संकलन
या वर्गातील सर्व व्यवस्था या पर्यावरण पूरक व प्लास्टिक मुक्त करण्यात आल्या होत्या. भोजनासाठी पळसाच्या पानाच्या पत्रावळ्याचा उपयोग करण्यात आला. तसेच जलबचत व स्वावलंबन असे प्रत्यक्ष संस्कार शिक्षार्थ्याना देण्यात आले. या वर्गासाठी किनवट शहरातील सर्व 28 वस्त्या व आजूबाजूच्या 18 गावातील 2 हजार घरामधून सलग 15 दिवस एकूण 31500 इतक्या चपाती संकलित करण्यात आल्या. दरम्यान एक दिवस मातृभोजन करण्यात आले, ज्यामध्ये मातांनी सर्व शिक्षार्थ्याना जेवण वाढले. तर अनेक समाज बांधवांनी या ईश्वरी कार्यात आपलाही काही सहभाग असावा म्हणून वेळेचे समर्पण केले.