नांदेड। जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थानिक स्वराज्य संस्था व काही विधानसभा मतदारसंघा पुरती मर्यादीत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे, ना.धनंजय मुंडे, जिल्हा समन्वयक आ.विक्रम काळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात 9 विधानसभा सह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद वाढवू असा विश्वास माजी विरोधीपक्ष नेते जीवन घोगरे पाटील यांनी व्यक्त केला.
शहरासह ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघठन वाढविण्यासाठी दोन जिल्हाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती झाल्यानंतर दोन्ही जिल्हाध्यक्षांनी किनवट, माहूर, धर्माबाद, मुदखेड, नायगाव, बिलोली आदी तालुक्यामध्ये जावून कार्यकर्त्याच्या भेटी-गाठी घेतल्या आहेत. उत्तरचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर पवार यांनी ग्रामीण भागात तालुका निहाय बैठका घेवून संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दुसरे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांनीही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये बैठका घेवून आढावा घेतला आहे. त्यामुळे येणार्या काळात नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे संघटन अधिक मजबूत होणार आहे. नांदेड शहरातील विविध प्रभागामध्ये जिल्हाध्यक्ष व जीवन घोगरे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून संघटन बांधणीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. येणार्या महापालिका निवडणूकीत प्रत्येक प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी कार्यकर्त्यांकडून चाचपणी सुरू आहे.
महापालिका निवडणूक अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे, ना.धनंजय मुंडे, आ.विक्रम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकतीनिशी निवडणूक लढविण्याची रणनिती आखली जात आहे. तसेच 9 विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारी देण्यासाठी सक्षम उमेदवाराची चाचपणी पक्ष श्रेष्ठीकडून केली जात आहे. राष्टवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष इंजि. विश्वांभर पवार, जिल्हाध्यक्ष दिलीप धर्माधिकारी व माजी विरोधीपक्ष नेता जीवन घोगरे पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत. त्यामुळे येणार्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट जिल्ह्यात सक्षम राजकीय पक्ष बनविण्याचा विश्वास महापालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते जीवन घोगरे पाटील यांनी व्यक्त केला.