नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्र संकुलातर्फे ‘अलजेब्रा आणि नंबर थेअरी’ या विषयावर दि. ९ व १० ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दि. ९ ऑक्टोबर रोजी कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये करण्यात आले.
यावेळी चेन्नई येथील ‘द इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटीकल सायन्सेस’चे प्रो. के. श्रीनिवास, हॉवरा वेस्ट बंगाल येथील ‘आर के एम व्हि एज्युकेशनल आणि रिसर्च इन्स्टिट्यूट’ चे प्रो. स्टिफन बेयर आणि कांचीपुरम येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नोलॉजी डिझाईन अँड मॅनुफॅक्चरिंग’चे डॉ. एम. सुब्रमणी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रो. के. श्रीनिवास यांनी प्रेरक शायरीचे उदाहरण देत उपस्थित विद्यार्थी, संशोधक व शिक्षकांना प्रोत्साहित करून मार्गदर्शन केले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी नविन शैक्षणिक धोरणामुळे होणारे शैक्षणिक बद्दल आणि त्यामध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजनाबाबतचे महत्व सांगितले. तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘ग्यान योजना’ बद्दल माहिती दिली आणि त्याची उपयुक्तताही विषद केली. अशा प्रकारच्या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा जागतिक पातळीवर विकास होण्यासाठी मदत होत असते. असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेच्या सचिव डॉ. उषा सांगळे यांनी केले व कार्यशाळेच्या आयोजनाचे महत्व सांगितले. संकुलाचे संचालक डॉ. डी.डी. पवार यांनी संकुलाच्या प्रगती विषयी माहिती देत संकुलामध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या विषयावर ३० च्या वर कार्यशाळा, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्याची माहिती दिली. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संकुलातील शिक्षक, संशोधक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले आहे.