हिमायतनगर,अनिल मादसवार| गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता हिमायतनगर पोलिसांनी शहरातील १४ गुन्हेगार युवकांना तीन दिवसाकरीता तडीपारीची नोटीस बजावली आहे. यामुळे सदरील युवकांना गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेता येणार नाही. वरिष्ठांच्या सुचनेच पालन करत शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी बजावलेल्या नोटीस मुळे शहर परिसरात खळबळ उडाली आहे.
सध्या सर्वत्र गणेशोत्सव धुमधडाक्यात सुरु आहे. दरम्यान विसर्जन काळात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती, दखलपात्र गुन्हे दाखल झालेले, गुंडांची यादी तयार करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर याना दिल्या होता. वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत त्यांनी गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होऊ नये म्हणून युवकांची यादी तयार करून उपविभागीय अधिकारी अरुण संगेवार यांच्याकडे पाठविली होती.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता उपविभागीय दंडाअधिकारी हदगाव यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून सदरील यादीला मान्यता दिली आहे. पोलिसांनी हिमायतनगर शहरातील १४ युवकांना तीन दिवसाकरीता म्हणजे दि. २७ सप्टेंबर २०२३ चे सकाळी ७ वाजेपासून ते दि. २९ सेप्टेंबरचे सकाळी १० वाजेपर्यंत उत्सवात भाग घेण्यास बंदी केल्याची म्हणजेच तडीपारीची नोटीस बजावली आहे. शहरातील १४ गुन्हेगार युवक शासनाचा आदेश झुगारून गणेशोत्सवा- मध्ये शांतता भंग करू शकतात. असा ठपका पोलीस प्रशासनाकडून ठेवण्यात आला असून, मंडळाचे सदस्य तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचा यात समावेश आहे.
शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी १४ युवकांना तडीपार केलं – पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर
गणेशोत्सवाचे शेवटचे तीन दिवस म्हणजेच दि. २७ सप्टेंबर २०२३ चे सकाळी ७ वाजेपासून ते दि. २९ सेप्टेंबरचे सकाळी १० वाजेपर्यंत उत्सवात भाग घेण्यास बंदी करण्यात आली असून, तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरून आणि उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशावरून उत्सव काळातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी १४ युवकांना तडीपार करण्याचा आदेश काढले आहेत. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी व गावकऱ्यांनी गणेश विसर्जन शांततेत करून पोलिसांना सहकार्य करावे जो कोणी उत्सवाच्या दरम्यान शांतता भंग करेल. त्याची कदापि गय केली जाणार नाही असेही पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर यांनी दिली.